भारतीय वंशाच्या नील मोहनकडे यूट्युबची जबाबदारी

सुसान व्होजिकी झाल्या पायउतार

भारतीय वंशाच्या नील मोहनकडे यूट्युबची जबाबदारी

अमेरिका स्थित भारतीय वंशाचे नील मोहन यांची यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्णी लागली आहे. सुसान व्होजिकी या आपल्या पदावरून पायउतार झाल्यामुळे निल मोहन हे आता नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. नुकतीच याबाबत यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने ही घोषणा केली आहे. सुसान व्होजिकी या गुगलच्या जाहिरात विभाग उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. त्या २०१४ साली यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाल्या होत्या. पण कौटुंबिक, आरोग्य आणि वैयक्तिक प्रकल्पांवर लक्ष देण्यासाठी त्यांनी आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले.

युट्युब हे जगातील लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रिमिग प्लॅटफॉर्म आहे. नील मोहन यांनी २००८ साली गुगलमध्ये आपल्या कामाला सुरुवात केली त्यानंतर २०१५ साली त्यांनी युट्युबचे उत्पादन अधिकारी म्हणून काम सुरु केले होते. नील मोहन आणि सुसान यांनी एकत्रपणे काम केले आहे. सुसान यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यावर युट्युबचे म्हणजेच अल्फाबेट इंकचे शेअर्स एक टक्क्यांनी पडले असल्याची माहिती आहे. नील मोहन आता यूएस स्थित भारतीय वंशज असलेल्या दिग्गजांच्या यादीत जाऊन बसले आहेत. यामध्ये ऍडोबचे सीईओ शंतनू नारायण , मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नाडेला , पेप्सिकोच्या सीईओ  इंद्रा नूयी , गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि यामध्ये आता नील मोहन यांचे नाव जोडले जात आहे.

नील मोहन यांची ओळख

४९ वर्षीय नील मोहन हे अभियांत्रिकी पदवीधर आहेत. २०१५ पासून ते यूट्यूब चे मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून काम करत होते.  १९९६ मध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर नेट ग्रॅव्हिटी नावाच्या स्टार्टअप मध्ये काम करू लागले. हाच स्टार्टअप जाहिरात कंपनी डबल क्लिक नि विकत घेतली. नील मोहन यांनी ऍड वर्ड, ऍड सेन्स, डबल क्लीकसह गूगलच्या जाहिरात उत्पादनांना पुढे नेण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. नील हे काही काळ मायक्रोसॉफ्टचे कॉर्पोरेट  स्ट्रॅटिजि व्यवस्थापक होते.

सुसान यांनी राजीनामा देताना सांगितले आहे की, नऊ वर्षांपूर्वी जेव्हा मी यूट्यूब मध्ये काम करण्यास सुरुवात केली तेव्हा माझे पहिले प्राधान्य एक चांगले नेतृत्व आणणे हेच होते. आणि नील मोहन हे त्यापैकी एक होते. नील मोहन यांना खूप शुभेच्छा असे म्हंटले आहे.

Exit mobile version