लॉन बॉल, टेबलटेनिस सांघिक प्रकारात सोनेरी कामगिरी
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एका वेगळ्या खेळात सुवर्णपदक जिंकून आश्चर्याचा धक्का दिला. लॉन बॉल या खेळात भारताने ही सोनेरी कामगिरी केली. रुपा राणी तिर्की (कर्णधार), लव्हली चौबे, पिंकी व नयनमोनी सैकिया या चौघींनी हे सुवर्णपदक जिंकले. २०१८ला राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाला त्यांनी पराभूत केले. त्याचवेळी भारताने टेबल टेनिसमध्ये सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे भारताच्या सुवर्णपदकांची संख्या ५ झाली.
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम संधी मिळविली. त्यात पहिल्या फेरीत भारताला एक गुण मिळाला. पण अखेरच्या क्षणी दक्षिण आफ्रिकेने दोन गुण मिळवित आघाडी घेतली. नंतर भारताने २ गुणांची आघाडी मिळविली.
गतविजेत्या भारताने टेबल टेनिसमध्ये सिंगापूरला ३-१ असे नमविले आणि विजेतेपद आपल्याकडेच राखले
.
भारताच्या हरमित देसाई व सत्यन ज्ञानशेखरन यांनी पहिली फेरी जिंकली. त्यात त्यांनी तिन्ही गेम जिंकत सिंगापूरवरील वर्चस्व सिद्ध केले. एकेरीच्या सामन्यात शरथ कमलला डावखुऱ्या झे यू च्यूकडून पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या एकेरीत ज्ञानशेखरनने कोएन पांगवर मात केली आणि भारताला आघाडी मिळवून दिली. तर हरमित देसाईने शेवटच्या लढतीत च्यूवर विजय मिळविला आणि भारताचे सुवर्ण निश्चित झाले.
हे ही वाचा:
पोलीस भरतीतला तरुण ‘डमी’ चित्रीकरणामुळे सापडला….
आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघेंवर बलात्कार प्रकरणात गुन्हा?
आमदार संजय शिरसाट यांनी हटविला उद्धव ठाकरेंचा फोटो!
‘लालसिंह चढ्ढा’वर प्रेक्षकांची का सटकली?
लॉन बॉलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ८-२ अशी आघाडी घेतली होती. पण ११व्या फेरीपर्यंत दक्षिण आफ्रिकेने १०-८ अशी बाजी मारली. त्यामुळे अखेरच्या ४ फेऱ्यांत भारताला ही बाजी उलटविणे आवश्यक होते. भारताने १२-१० अशी आघाडी घेतली १४व्या फेरीत आणखी तीन गुण घेतले. त्यामुळे अखेरच्या फेरीत दक्षिण आफ्रिकेला ६ गुण घेण्याची आवश्यकता होती. पण त्यांना केवळ २ गुण घेता आले आणि भारताचे सुवर्ण निश्चित झाले.