भारताने कुस्तीत आपल्या पदकांचा सिलसिला सुरूच ठेवला असून राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आणखी तीन सुवर्णपदकांची कमाई केली. विनेश फोगाट, रवी दहिया आणि नवीन यांनी ही सुवर्णपदके जिंकली.
नवीनने पाकिस्तानच्या मोहम्मद शरीफ ताहीरला ७४ किलो वजनी गटात नाकीनऊ आणले. त्याने ही लढत ९-० अशी जिंकली. फ्रीस्टाइल कुस्तीत त्याने पहिल्या फेरीत २-० अशी आघाडी घेतली. नवीनने नंतर पुन्हा दोन गुण घेत आघाडी वाढविली आणि शेवटी ही लढत ९-० अशी जिंकली. अखेरच्या तीन मिनिटांत नवीनने आपल्या प्रतिस्पर्ध्याला मॅटवर दाबून ठेवले. त्यामुळे भारताचे सुवर्णपदक निश्चित झाले.
त्याआधी भारताच्या पूजा गेहलोतने महिलांच्या ५० किलो वजनी गटात ब्राँझपदक जिंकले. पण भारताची सुवर्णमालिका सुरू ठेवली ती रवी दहिया आणि विनेश फोगाट यांनी. रवी दहियाने आपल्या पहिल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात ही सोनेरी कामगिरी केली. त्याने प्रतिस्पर्ध्यावर १०-० असा सहज विजय मिळविला तर विनेश फोगाटने महिलांच्या ५३ किलो वजनी गटात श्रीलंकेच्या चामोदयावर विजय मिळविला.
इतर स्पर्धाप्रकारांमध्ये भारताने ४ बाय १०० मीटर रिले प्रकारात अंतिम फेरी गाठली तर बॉक्सिंगमध्ये नितू घंघासने महिलांच्या ४८ किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली. अमित पंघलनेही ५१ किलो वजनी गटात अंतिम फेरीत प्रवेश केला तर निखत झरीनने महिलांच्या ५० किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली.
हे ही वाचा:
हो हो हो खरंच आता पर्यटकांसाठी मुंबईत हो – हो बस सेवा
जगदीप धनखड यांनी मोठ्या फरकाने जिंकली उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक
ममता बॅनर्जींचा आदेश दोन खासदारांनी धुडकावला!
टेबलटेनिसमध्ये शरथ कमल आणि जी. सत्यन यांनी पुरुषांच्या दुहेरीची अंतिम फेरी गाठली. मिश्र दुहेरीतही भारताच्या शरथ आणि श्रीजा यांनी अंतिम फेरीत उडी घेतली. मनिका बात्रा व दिया चितळे यांनी महिलांच्या दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
क्रिकेटमध्ये भारतीय महिलांनी इंग्लंडवर चार धावांनी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. बॅडमिंटनमध्ये सिंधू, लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाने दक्षिण आफ्रिकेवर ३-२ असा विजय मिळवित सुवर्णपदकाच्या दिशेने कूच केले. आता अंतिम फेरीत भारत काय कमाल करतो ते पाहायचे.