सिराज, शमी, इशांत, बूमराहने इंग्लंडला उखडले
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत वेगवान गोलंदाजांनी केलेल्या कमाल कामगिरीमुळे भारताने लॉर्डसवर झालेली ही कसोटी १५१ धावांनी जिंकत पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पहिली कसोटी अनिर्णीत राहिली होती.
भारतीय वेगवान गोलंदाजांनी या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. मोहम्मद सिराजचे ८ बळी, अनुभवी इशांत शर्माचे बळींचे पंचक, मोहम्मद शमी आणि बूमराहचे प्रत्येकी ३ बळी या जोरावर भारतीय संघाने ही लढत जिंकली.
दुसऱ्या डावात ८ बाद २९८ धावांवर डाव घोषित करून भारताने यजमान इंग्लंडसमोर २७२ धावांचे आव्हान ठेवले होते. पण अखेरच्या दिवशी इंग्लंडला धीर धरता आला नाही. इंग्लंडचा संघ अवघ्या १२० धावांत गडगडला.
या सामन्यात सकाळच्या सत्रात भारताच्या मोहम्मद शमीने केलेली ६ चौकारांसह केलेली ५६ धावांची चिवट खेळी, अजिंक्य रहाणेच्या ६१ धावा, जसप्रीत बूमराहच्या ३४ धावा या जोरावर भारतीय संघाने २९८ धावांपर्यंत मजल मारल्यावर भारताने डाव घोषित करत २७२ धावांचे लक्ष्य इंग्लंडसमोर ठेवले. पण इंग्लंडची सलामीची जोडी रोरी बर्न्स आणि डोम सिबली हे भोपळाही न फोडता बाहेर पडल्यानंतर वन डाऊन फलंदाज हसीब हमीदही ९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर जो रूटचा अपवाद वगळता (३३) इंग्लंडकडून कुणीही फारसा प्रतिकार केला नाही.
हे ही वाचा:
पालिकेचा भंगारात नवा कोरा घोटाळा?
…आणि तिच्या अंगावरील दागिन्यांचा झाला दगड
सदैव अटल: श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींचे पुण्यस्मरण
कोंबड्याचे ‘कुकू च कू’, नी कश्मीरातील पहाट
दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या होती जोस बटलरची. त्याने २५ धावा केल्या. अवांतर धावाच इंग्लंडसाठी दिलासा देणाऱ्या ठरल्या. या २९ धावांमुळे निदान त्यांनी १२० धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून या अतिरिक्त धावा दिल्या गेल्या, अन्यथा इंग्लंडने स्वतःहून १०० पेक्षाही कमी धावा केल्या. या सामन्यात के. एल. राहुल सामन्यात सर्वोत्तम ठरला. त्याने पहिल्या डावात १२९ धावांची केलेली खेळी महत्त्वाची ठरली होती. आता तिसरी कसोटी लीड्स येथे २५ ते २९ ऑगस्ट या कालावधीत खेळविली जाणार आहे.
स्कोअरबोर्ड
भारत ३६४ आणि ८ बाद २९८ डाव घोषित वि. इंग्लंड ३९१ आणि १२० (जो रूट ३३, जोस बटलर २५, मोईन अली १३, मोहम्मद सिराज ३२-४, जसप्रीत बूमराह ३३-३, इशांत शर्मा १३-२)