सध्या भारताच्या दौऱ्यावर असलेल्या इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव केला. परंतु त्यानंतर दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवसापासून आपला दबदबा राखत भारताने आज सामन्याच्या चौथ्या दिवशीच इंग्लंडचा ३१७ धावांनी दणदणीत पराभव केला. जवळपास अर्ध्या दिवसातच आजचा खेळ संपुष्टात आला. या विजयामुळे भारताची मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली गेली आहे.
हे ही वाचा:
सातत्याने दबदबा राखणाऱ्या भारतासाठी दिवसाची सुरूवात होतानाच इंग्लंडचे तिन खेळाडू बाद झालेले होते. डॅन लॉरेन्स आणि जो रूट यांनी इंग्लंडच्या आजच्या दिवसाच्या फलंदाजीला सुरूवात केली. त्यानंतर लवकरच डॅन लॉरेन्स रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर यष्टिचित झाला. लॉरेन्स नंतर जो रूट आणि बेन स्टोक्स यांनी काहीकाळ टिकाव धरला होता. मात्र रविचंद्रन अश्विनच्या फिरकीत बेन स्टोक्स अडकला आणि झेलबाद झाला. जो रूट ३२ धावांवर असताना कुलदीप यादवच्या एका चेंडूवर झेलबाद झालाच असता, परंतु मोहम्मद सिराज कडून झेल सुटल्याने त्याला जीवदान मिळाले. ऑली पोप आणि बेन फोक्स विशेष प्रभाव न पाडता अगदी थोड्या धावांवर बाद झाले. जो रूटला देखील ३३ धावांवर अजिंक्य रहाणेच्या हातात झेल देऊन अक्षर पटेलने बाद केले. ऑली स्टोनला सुद्धा अक्षरनेच पायचित केले. त्यानंतर मोईन अलीने गोलंदाजांवर प्रहार करायला सुरूवात केली, परंतु त्याला देखील रिषभ पंतच्या हस्ते कुलदिप यादवने यष्टिचित केले आणि भारताच्या विजयावर मोहोर उमटवली.
या डावात अक्षर पटेलने तब्बल ५ विकेट घेतल्या तर त्याखालोखाल रविचंद्रन अश्विनने ३ विकेट घेतल्या आणि कुलदीप यादवने २ विकेट मिळवल्या. या डावात संपूर्णपणे भारतीय फिरकीपटूंचे प्रभूत्व पहायला मिळाले.