अब्जावधी डॉलर किमतीच्या सेमी कंडक्टर गुंतवणुकीच्या माध्यमातून भारत चीनला मागे टाकेल, असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात या संदर्भातील दोन मेगा युनिटची निर्मिती करण्याचा करार केला जाईल, असे सरकारतर्फे सांगण्यात आले.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनासाठी भारतात चांगले वातावरण असल्यामुळे अधिकाधिक कंपन्या येथे गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे आयटी आणि इलेक्ट्रॉनिकचे केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची ग्राहक क्षेत्राकडून खूप मागणी असल्यामुळे भारत ही सेमिकंडक्टर कंपन्यांसाठी मोठी बाजारपेठ आहे. ‘भारतातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन एका चांगल्या टप्प्यावर आहे. आम्ही या क्षेत्रात सन २०२६पर्यंत ३०० अब्ज डॉलर गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे. आम्ही हे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. त्यामुळे अर्थातच सेमी कंडक्टरची नितांत गरज भासेल, त्यामुळे सन २०२९पर्यंत या क्षेत्रात एकूण ११० अब्ज डॉलरचा टप्पा गाठता येईल,’ असा विश्वास चंद्रशेखर यांनी व्यक्त केला.
गुजरातमध्ये येऊ घातलेल्या मायक्रॉन या २.७ अब्ज डॉलर पॅकेजिंग आणि टेस्टिंग प्रकल्पामुळे अधिकाधिक कंपन्या येथे गुंतवणूक करण्यास उत्सुक होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘सेमीकंडक्टरची निर्मिती करणाऱ्या मोठ्या कंपन्यांपैकी एक असणारी मायक्रॉन कंपनी ही भारतात गुंतवणूक करणारी पहिली कंपनी आहे. त्यामुळे या कंपनीच्या पावलावर पाऊल ठेवून अधिकाधिक कंपन्या येथे येतील. त्यामुळे भारताला फायदा होईल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
‘चीन ९०० अब्ज डॉलरच्या किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात करते. तर, त्यांना ६०० अब्ज डॉलर सेमिकंडक्टर आयात करावे लागतात. त्यांनी सेमीकंडक्टरच्या उत्पादनासाठी गेल्या २० वर्षांत २०० अब्ज डॉलर खर्च केले आहेत. मात्र ते अपयशी ठरले. मात्र त्याउलट भारताने सेमीकंडक्टर निर्मितीसाठी गुंतवणूकदारांना उत्तेजन देण्यासाठी केवळ १० अब्ज डॉलर खर्च केले आहेत आणि आपण अशा मोठ्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहोत, ज्यांनी आपल्यापेक्षा १० पट अधिक पैसे खर्च केले आहेत, पण २० वर्षांमध्ये त्यांनी तितकिशी चांगली कामगिरी केलेली नाही. त्यामुळे आपण लवकरच सेमीकंडक्टर निर्मितीत चीनला मागे टाकू,’ असे ते म्हणाले.