या वर्षाच्या मध्यात भारताची लोकसंख्या चीनला मागे टाकेल अशी माहिती संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
सध्या चीनची लोकसंख्या भारतापेक्षा अधिक असली तरी या वर्षातच भारत चीनला मागे टाकणार आहे. या वर्षाच्या मध्यात भारताची लोकसंख्या १ अब्ज ४२ कोटी ८६ लाख इतकी होईल तर चीनची लोकसंख्या तेव्हा १ अब्ज ४२ कोटी ५७ लाख असेल. म्हणजे ३० लाखांनी भारत चीनला मागे टाकणार आहे.
अमेरिका ही लोकसंख्येच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असून ती ३४ कोटींच्या घरात असेल. जागतिक लोकसंख्येतील वाढीत २०५० पर्यंत काँगो, इजिप्त, इथियोपिया, भारत, नायजेरिया, पाकिस्तान, फिलिपिन्स आणि टांझानिया यांचे योगदान असेल. लोकसंख्येविषयीच्या तज्ज्ञांनी निश्चित तारीख सांगितलेली नाही. कारण भारत आणि चीनकडून त्यासंदर्भातील आकडेवारी मिळालेली नाही. २०११मध्ये भारतात जनगणना झाली होती. ती १० वर्षांनी म्हणजे २०२१ला अपेक्षित होती, पण कोरोनामुळे जनगणना करता आलेली नाही.
हे ही वाचा:
राज्यातील शाळेची घंटा १५ जूनला वाजणार
राज्याच्या कारागृहातील कैद्यांवर असेल आता ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर
तब्बल दीडशे सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा सापडला मंगळसूत्र चोर
जागतिक लोकसंख्या ही ८ अब्ज ४५ कोटी आहे. त्यातील एक तृतियांश लोकसंख्या ही भारत आणि चीन यांची आहे. जर या दोन्ही देशातील लोकसंख्येची गती पाहिली तर चीनमधील लोकसंख्या वाढीचा वेग हा भारतापेक्षा कमी झालेला आहे. गेल्या सहा दशकात गेल्यावर्षी चीनचा लोकसंख्या दर खाली आला होता. त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला. भारतातील वार्षिक लोकसंख्या वाढ ही २०११पासून १.२ टक्के आहे. गेल्या १० वर्षात ती १.७ टक्के इतकी होती. लोकसंख्या वाढीमुळे संकटाचा धोका नाही तर त्यामुळे प्रगती, विकास आणि आपल्या इच्छा आकांक्षाचे प्रतिबिंब असल्याचे मानले जाते.
संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीने म्हटले आहे की, मुले व्हावीत की नको याचे अधिकार महिलांना मिळावेत यादृष्टीने लक्ष केंद्रित केले जात आहे. लोकसंख्या निधीच्या प्रमुख नतालिया कानेम म्हणतात की, असा अधिकार असला पाहिजे पण तसा तो सध्या नाही. ४४ टक्के महिलांना यावर नियंत्रणच ठेवण्याची मुभा नाही.