पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. ऑस्ट्रेलियातील मंदिरे, प्रार्थनास्थळांवर हल्ले होत असल्याचा मुद्दा पंतप्रधानांनी उपस्थित केला आणि ऑस्ट्रेलियात काही फुटिरतावादी गट कार्यरत असल्याबद्दलही चिंता प्रकट केली.
दोन्ही देशातील संयुक्त बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मोदी म्हणाले की, अशा प्रकारचे फुटिरतावादी घटक आणि त्यांच्या कृतीचे कधीही समर्थन केले जाऊ शकत नाही. ते सहन केले जाणार नाही. त्यातून भारत ऑस्ट्रेलिया संबंधांवरही त्याचा परिणाम होऊ शकेल. अशा घटकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीस यांनी दिले आहे, असे मोदी यांनी सांगितले.
मोदी म्हणाले की, अल्बानीस आणि मी यापूर्वीही ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या विषयावर बोललो आहोत. या दोन देशातील संबंधांमध्ये मिठाचा खडा टाकणाऱ्या अशा घटकांना कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. पंतप्रधान अल्बानीस यांनी यासंदर्भात मला आश्वस्त केले आहे.
हे ही वाचा:
बेशिस्तीच्या कारणास्तव काँग्रेसमधून आशीष देशमुखांची हकालपट्टी
सौरव गांगुली आता त्रिपुरा राज्याच्या पर्यटनाचा ‘कॅप्टन’
संसद भवनाच्या उद्घाटनाला विरोधकांचे अवलक्षण
फेस-स्वॅपिंग तंत्रज्ञानाच्या आधारे मित्र असल्याची बतावणी करत लुटले पाच कोटी
यासंदर्भात अल्बानीस म्हणाले की, ऑस्ट्रेलियात विविध संस्कृती एकत्र नांदत आहेत. लोकांच्या भावनांचा, त्यांच्या श्रद्धेचाही आम्ही सन्मान करतो. असे हल्ले आम्ही खपवून घेणार नाही.
गेल्या काही महिन्यात ऑस्ट्रेलियात मंदिरांवर याच फुटिरतावादी घटकांकडून आक्रमणे होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात खलिस्तानी चळवळीतील काही लोक सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ब्रिस्बेनमधील लक्ष्मीनारायण मंदिरावर मार्च महिन्यात हल्ला झाला होता. खलिस्तानी दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला होता. त्यात मंदिराच्या संरक्षक भिंतीचे नुकसान झाले होते. २३ जानेवारीला मेलबर्न येथील इस्कॉन मंदिराच्या भिंतीचे नुकसान करून त्यावर हिंदुस्थान मुर्दाबाद असे लिहून भीती निर्माण करण्यात आली होती.