भारत सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. दररोज लक्षावधींच्या आकड्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने भारताच्या आरोग्य सुविधांवर कमालीचा ताण आला आहे. भारतात रेमडेसिवीरची कमतरता जाणवत आहे. त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने आता रेमडेसिवीर आयात करण्याचे नक्की केले आहे.
या आयातीमधील रेमडेसिवीरची ७५,००० डोसेसची पहिली खेप कालच भारतात दाखल झाली. भारताने इजिप्त आणि अमेरिका या देशांकडून रेमडेसिवीर आयात करायला सुरूवात केली आहे. एचएलएल या भारतीय कंपनीने अमेरिकेच्या आणि इजिप्तच्या औषध उत्पादक कंपन्यांकडे सुमारे साडेचार लाख व्हायलची मागणी केली आहे.
हे ही वाचा:
गुरू तेगबहादूर : सर्वोच्च बलिदानाचा महामेरू
सुनील मानेला वाटते आहे तुरुंगाची भीती
चुकांमधून न शिकणारे ठाकरे सरकार कोरोनाबाबतीत पुनश्चः अपयशी
अमेरिकेतील कंपनीकडून भारताला येत्या दोन दिवसात ७५,००० ते एक लाख रेमडेसिवीर डोसेस मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर १५ मे पर्यंत किंवा त्याच्या आधीच अजून एक लाख डोसेस पाठवले जाणार आहेत. इजिप्तकडून सुरूवातीला दहा हजार रेमडेसिवीर मिळणार आहेत, पुढे १५ मे पर्यंत हा आकडा वाढून पन्नास हजारपर्यंत जाणार आहे.
भारताने देखील आपले रेमडेसिवीर उत्पादन वाढवायला सुरूवात केली आहे. २७ एप्रिल रोजी भारतातील सात रेमडेसिवीर उत्पादकांनी त्यांचे उत्पादन ३८ लाखांपासून वाढवून तब्बल १.०३ कोटी व्हायल प्रति महिना एवढे केले आहे. त्याबरोबरच भारताने रेमडेसिविरच्या निर्यातीवर निर्बंध घातले असून, त्याच्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर देखील निर्बंध घातले आहेत. केंद्र सरकारने रेमडेसिवीरवरील आयातशुल्क मात्र पूर्णपणे माफ केले आहे.