आता गहू निघाले तुर्कीला!

आता गहू निघाले तुर्कीला!

रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि जागतिक पातळीवर रशियाला एकटे पाडण्यासाठी म्हणून अमेरिका, ब्रिटन आणि काही युरोपीय देश पुढे आले. त्यानंतर या देशांनी रशियावर निर्बंध घातले. रशियामध्ये उत्पादन होणाऱ्या वस्तूंवर बंदी घातली. दुसरीकडे युक्रेनमध्ये असलेल्या परिस्थितीमुळे वस्तूंच्या इम्पोर्ट एक्पोर्टवर मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे या दोन्ही देशांमधून ज्या वस्तू मोठ्या प्रमाणात एक्स्पोर्ट होत होत्या त्या तेवढ्या प्रमाणात होत नाहीयेत. त्यामुळे अर्थात या उत्पादनांसाठी पर्याय शोधण्याची गरज इतर देशांना निर्माण झालीये आणि तसे प्रयत्न सुरूही झालेत.

एक संधी भारताला मिळाली आहे. तुर्कीने भारताला ही संधी दिली आहे. तुर्की भारताकडून ५० हजार टन गहू साधारण १२५ कोटी रुपयांना विकत घेणार आहे. गहू उत्पादनात रशिया आणि युक्रेनचा मोठा वाटा आहे. जागतिक निर्यात पेठेत २५ टक्के गहू हा रशिया आणि युक्रेनमधून येत असतो. आता रशियावर असलेले निर्बंध आणि युक्रेनमधली एकूणच परिस्थिती पाहता हे दोन्ही देश सध्या तरी गहू पुरवू शकणार नाहीत. याचा अंदाज घेत तुर्कीने गेल्या आठवड्यात भारताचा गहू आयात करण्याचं मान्य केलं आहे. याचबरोबर इतरही काही देश भारताकडून गहू मिळेल का अशी विचारणा करत आहेत. इजिप्त, इस्रायल, ओमान, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया अशा देशांनी भारताकडून गहू मिळू शकेल का अशी विचारणा केली आहे. त्यामुळे आता तुर्की नंतर कोणत्या देशाला भारत गहू निर्यात करणार याकडे लक्ष असणार आहे.

भारत असाच इजिप्तला गहू निर्यात करणार आहे. रशिया, युक्रेनकडून गहू घेणारा इजिप्त नव्या पर्यायांचा शोध घेऊ लागला आणि इजिप्तने भारत आपल्याला गहू पुरवू शकतो असा विचार केला. त्यानंतर इजिप्तच्या काही अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि पंजाबमधील काही प्रक्रिया केंद्रांना, बंदरांना आणि शेतांना भेट दिली. त्यानंतर भारताचा गहू आपल्या नागरिकांना चालू शकतो हे पटल्यावर इजिप्तकडून भारताच्या गव्हाला हिरवा कंदील दाखवण्यात आला.

इजिप्त हा जगातीला सर्वात मोठा गहू आयात करणारा देश आहे. रशिया आणि युक्रेन हे इजिप्तची गहूची ७० टक्के मागणी पूर्ण करायचे. अन्नधान्याच्या निर्यातीच्या दिशेने भारतासाठी इजिप्त आणि तुर्की या दोन देशांना गहू पुरवणे ही मोठी संधी ठरणार आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी हा एक अतिशय फायदेशीर करार ठरणारे. २०२१ आणि २०२२ मध्ये भारताने सुमारे २ अब्ज डॉलर मूल्याच्या ७० लाख टन गव्हाची विक्रमी निर्यात केली होती. साधारणपणे बांगलादेश, युएई, श्रीलंका, ओमान, कतार आणि मलेशिया या देशांकडून होणाऱ्या मागणीवर भारताचा गव्हाचा निर्यात आलेख अवलंबून असतो. स्वतःची गरज भागवून मग निर्यात करायचं असल्यामुळे गव्हाच्या जागतिक व्यापारात भारताचं योगदान हे कमी राहिले आहे. २०१९-२० या वर्षात फक्त २ लाख टन आणि २०२०-२१ या वर्षात २० लाख टन गव्हाची निर्यात भारतामधून झाली होती. भारताचा गहू निर्यातीचा हा आलेख सध्या नक्कीच वाढतोय.

हे ही वाचा:

गुगल ट्रान्सलेटमध्ये संस्कृतचा अंतर्भाव

आम्ही घरूनच काम करणार, म्हणत कर्मचाऱ्यांनी दिला राजीनामा

संभाजी राजेंच्या नव्या संघटनेची घोषणा

मुंब्र्यात वसुली सरकार, पोलिसांनीच व्यापाऱ्याला लुटले

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षामुळे वाढत्या जागतिक मागणीच्या पार्श्वभूमीवर २०२२-२३ या वर्षात गव्हाची विक्रमी १ कोटी टन निर्यात करण्याचे लक्ष्य भारताने ठेवले आहे. त्यामुळे रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांची एकूणच परिस्थिती निवळण्यासाठी किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही पण तोपर्यंत भारतासाठी आणि भारतीय उत्पादनांसाठी आलेल्या सगळ्या संधीचं सोन करण्याची ही योग्य वेळ आहे आणि भारत वेळ साधून नक्कीच मौके पे चौका मारतोय. आता भारताला अजून कोणत्या नव्या संधी मिळणार आणि भारत मौके पे चौका मारणार याकडे लक्ष असणार आहे.

Exit mobile version