इजिप्तच्या जेवणात भारताचा गहू

इजिप्तच्या जेवणात भारताचा गहू

सध्या सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर झालाय. रशियावर घातलेल्या निर्बंधांमुळे आणि युक्रेनमध्ये असलेल्या परिस्थितीमुळे वस्तूंच्या इम्पोर्ट एक्पोर्टवर मोठा परिणाम दिसून येत आहे. मात्र, या युद्धादरम्यान भारताला नवी संधी मिळाली आहे. भारताला आपल्याकडे उत्पादन होणाऱ्या वस्तूंसाठी नव्या बाजारपेठा शोधण्याची, निर्माण करण्याची संधी मिळाली आहे. इतर देश जे उत्पादन किंवा वस्तू युक्रेन आणि रशियाकडून घेत होते पण आता युद्धपरिस्थितीत घेणं शक्य नाही आहे अशा वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी भारत तयारी दाखवू शकतो. त्याच दिशेने भारताने पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते आणि जागतिक निर्यात पेठेत २५ टक्के गहू हा रशिया आणि युक्रेनमधून येत असतो. आता जागतिक पातळीवर रशियावर निर्बंध घातल्यामुळे रशिया गहू एक्पोर्ट करू शकणार नाहीये. तसंच सध्या युक्रेनमध्ये जी परिस्थिती त्यामुळे युक्रेनही गहू एक्पोर्ट करू शकणार नाहीये. अशा परिस्थितीत अतिरिक्तसाठा असलेला भारत गव्हाची निर्यात करू शकणारे. भारताकडे सध्या २ कोटी ४२ लाख इतका गहू बफरमध्ये आहे. भारताची जी गव्हाची गरज आहे त्यापेक्षा हा बफरसाठा दुप्पट आहे. त्यामुळे भारत हा गहू एक्स्पोर्ट करू शकणारे. त्यामुळे गव्हासाठी नव्या बाजारपेठा निर्माण करण्याची भारताकडे संधी आहे.

रशिया, युक्रेनकडून गहू घेणारा इजिप्त नव्या पर्यायांचा शोध घेऊ लागला. त्यानंतर इजिप्तच्या कृषी विलगीकरण आणि कीटक जोखीम विश्लेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि पंजाबमधील काही प्रक्रिया केंद्रांना, बंदरांना आणि शेतांना भेट दिली. त्यानंतर इजिप्तकडून भारताच्या गव्हाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आणि आता इजिप्त भारताकडून गहू घेणार आहे.

इजिप्त हा जगातीला सर्वात मोठा गहू आयात करणारा देश आहे. इजिप्त दरवर्षी आपल्या देशातल्या १० कोटी नागरिकांची भूक भागवण्यासाठी साधारण ४ अरब डॉलरपेक्षा अधिक खर्च करतो. इजिप्तने भारताला गहू पुरवठादार म्हणून मान्यता दिलीये. यापूर्वी इजिप्त हा गहू रशिया युक्रेनसारख्या देशांमधून इम्पोर्ट करत होता. म्हणजे आकड्यात सांगायचे तर रशिया आणि युक्रेन हे इजिप्तची ७० टक्के मागणी पूर्ण करायचे. मात्र, आता युद्धामुळे या दोन प्रमुख गहू एक्स्पोर्ट करणाऱ्या देशांकडून पुरवठा होत नसल्यामुळे इजिप्त भारताला गहू विक्रीसाठी संधी देणारे. अन्नधान्याच्या निर्यातीच्या दिशेने भारतासाठी ही मोठी उपलब्धी ठरणार आहे. तसंच विशेषतः देशातील शेतकऱ्यांसाठी हा एक अतिशय फायदेशीर करार ठरणार आहे.

२०२१ मध्ये इजिप्तने ६१ लाख टन गव्हाची आयात केली होती आणि त्यावेळी भारत इजिप्तला गहू निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये नव्हता. २०२१ मध्ये इजिप्तने इम्पोर्ट केलेल्या गव्हापैकी ८० टक्क्यांपेक्षा जास्त गहू म्हणजेच सुमारे २ अब्ज डॉलरचा गहू रशिया आणि युक्रेनमधून मागवण्यात आला होता. २०२१ आणि २०२२ मध्ये भारताने सुमारे २ अब्ज डॉलर मूल्याच्या ७० लाख टन गव्हाची विक्रमी निर्यात केली होती. साधारणपणे बांग्लादेश, संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएई, कतार, श्रीलंका, ओमान आणि मलेशिया या देशांकडून होणाऱ्या मागणीवर भारतीय गव्हाच्या निर्यातीची वाढ अवलंबून असते. शिवाय येमेन, अफगाणिस्तान आणि इंडोनेशिया या देशांमध्येही गहू निर्यातीला चालना देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. २०२०- २१ पर्यंत गव्हाच्या जागतिक व्यापारात भारताचं योगदान हे कमी राहिलंय. २०१९- २० या वर्षात फक्त २ लाख टन आणि २०२०- २१ या वर्षात २० लाख टन गव्हाची निर्यात भारतामधून झाली होती. भारताचा गहू निर्यातीचा हा आलेख वाढतोय. या वर्षी इजिप्तला ३० लाख टन गहू निर्यात करण्याचं भारताचं लक्ष्य आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षामुळे वाढत्या जागतिक मागणीच्या पार्श्वभूमीवर २०२२-२३ या वर्षात गव्हाची विक्रमी १ कोटी टन निर्यात करण्याचे लक्ष्य भारताने ठेवलं आहे. त्यामुळे रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांची एकूणच परिस्थिती निवळण्यासाठी किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही पण तोपर्यंत भारतासाठी चालून आलेल्या संधीचा फायदा भारतातील निर्यातदारांनी घ्यायला हवा.

Exit mobile version