पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचा पाठींबा कायम असेल

मोदी-नेत्यानाहू एकमेकांशी फोनवरून बोलले

पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचा पाठींबा कायम असेल

इस्रायलने लेबनॉनस्थित हिजबुल्ला दहशतवादी गटाविरोधात आघाडी उघडली असून सर्व बाजूंनी कोंडी करण्यासाठी इस्रायल प्रयत्न करत आहे. लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये दोन दिवसांपूर्वी केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख हसन नरसल्लाह ठार झाला. परंतु, यानंतरही इस्रायलने हल्ले थांबवले नसून वारंवार चकमकी सुरूच आहेत. एकीकडे इस्रायल आणि हमास तर दुसरीकडे हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्या सुरू असलेल्या संघर्षामुळे पश्चिम आशियात तणाव वाढला आहे. या वाढत्या तणावाबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा केली.

पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांचा नरेंद्र मोदींना फोन आल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली असून नेतान्याहू यांनी पश्चिम आशियातील घडामोडींची माहिती नरेंद्र मोदींना दिली. शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी भारताचा पाठींबा कायम असेल असा विश्वास नरेंद्र मोदींनी यावेळी नेतान्याहू यांना दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या चर्चेविषयीची सविस्तर माहिती ट्वीट करून दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे की, “पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींबद्दल पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी बोललो. आपल्या जगात दहशतवादाला स्थान नाही. प्रादेशिक वाढ रोखणे आणि सर्व ओलिसांची सुरक्षित सुटका सुनिश्चित करणं महत्वाचं आहे. शांतता आणि स्थिरता लवकरात लवकर प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना भारताचा नेहमीच पाठिंबा असेल”, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे.

हे ही वाचा : 

लेबनॉनमध्ये इस्रायली सैन्य घुसलं; हिजबुल्लाच्या ठिकाणांवर जमिनीवरून हल्ले करण्यास सुरुवात

धारावीतील मशिदीचे अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात!

कानपूरमध्ये पुन्हा ट्रेन उलटवण्याचा कट, रुळावर सापडला ‘अग्निसुरक्षा सिलेंडर’

सुनीता विल्यम्स यांचा पृथ्वीवर येण्याचा मार्ग मोकळा; नासाची टीम अंतराळात पोहोचली

गेल्या आठवड्याभरात इस्रायलने हिजबुल्लाविरोधात आक्रमक कारवाई केली आहे. पेजर हल्ले, रेडिओ ब्लास्ट, हवाई हल्ले, गेल्या आठवड्यात हिजबुल्ला प्रमुख हसन नसराल्लाह याची हत्या आणि आता जमिनीवरून केलेलं आक्रमण अशा अनेक आघाडींवर इस्रायलने हिजबुल्लाचे कंबरडे मोडून ठेवले आहे. हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्लाहला ठार केल्यानंतर इस्रायलने आता थेट लेबनॉनमध्ये प्रवेश करत युद्ध पुकारले आहे. इस्रायल डिफेंस फोर्सने दक्षिणी लेबनॉनच्या हिजबुल्लाच्या ठिकाणांवर ग्राऊंड ऑपरेशन सुरू केले आहे. इस्रायली सैन्याने अखेर दक्षिण लेबनॉनमध्ये प्रवेश केला असून हिजबुल्लाच्या ठिकाणांवर जमिनीवरून हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.

Exit mobile version