बूमराहच्या दणक्याने कांगारू कोलमडले

भारताच्या १५० धावांना प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलिया ७ बाद ६७

बूमराहच्या दणक्याने कांगारू कोलमडले

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीचा पहिला दिवस रोमहर्षक ठरला. पर्थवरील या कसोटीत भारतीय संघ आपल्या पहिल्या डावात कोसळला. अवघ्या १५० धावांत भारताचा डाव आटोपला होता. पण ऑस्ट्रेलियालाही भारताने तेवढाच मोठा दणका देत ६७ धावांत त्यांचे सात फलंदाज तंबूत पाठवले. विशेष म्हणजे कर्णधार जसप्रित बूमराह याने १७ धावांत ४ बळी घेत कांगारुंना तडाखा दिला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट मैदानावरील कडवा संघर्ष पहिल्याच दिवशी पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाच्या हेझलवूडने २९ धावांत ४ बळी तर मार्श आणि स्टार्क यांनी घेतलेले प्रत्येकी २ बळी यामुळे कांगारुंनी पाहुण्या भारताला १५० धावांवरच रोखले. भारताचे नऊ फलंदाज तर यष्टीपाठी झेलचीत झाले यावरून कांगारुंनी गोलंदाजी किती अचूक आणि भेदक केली हे लक्षात येते.

भारताकडून नितीशकुमार रेड्डीने ४१ धावांची चिवट खेळी केली तर ऋषभ पंतने ३७ धावा केल्या. त्यामुळे भारताला निदान १५० धावांपर्यंत मजल मारता आली. ध्रुव जुरेलच्या ११ धावा सोडल्या तर अन्य भारतीय फलंदाजांनी एकेरी धावसंख्येवरच समाधान मानले.

हे ही वाचा:

ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी १० हजार पोलीस

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर बंगल्यावर महत्वाच्या नेत्यांची बैठक!

विनोद तावडेंनी राहुल गांधी, खर्गेंना पाठविली १०० कोटींची नोटीस!

कर्नाटकमध्ये ३१८ किलो गांजा पकडला

ही धावसंख्या पुरेशी नसली तरी पर्थच्या खेळपट्टीवर यजमानांना तडाखा देण्यात भारताने कसूर केली नाही. विशेषतः कर्णधार बूमराह याने आघाडीवर राहात यजमानांना दणका दिला. त्याने उस्मान ख्वाजा (८), नॅथन मॅकस्वीने (१०), स्टीव्ह स्मिथ (०) ही आघाडीची फळी कापून काढली. मोहम्मद सिराजने त्याला उत्तम साथ दिली. त्याने मार्नस लाबुशेन आणि मिचेल मार्श यांचे अडथळे दूर केले. त्यामुळे २७ षटकांत ऑस्ट्रेलियाची स्थिती ७ बाद ६७ अशी बिकट झाली. ऑस्ट्रेलियाचा संघ ८३ धावांनी पिछाडीवर आहे. सकाळच्या सत्रात पुन्हा दणका बसला तर ऑस्ट्रेलियन संघाला मोठी पिछाडी सहन करावी लागेल. त्याचा फटका दुसऱ्या डावात त्यांना बसू शकतो. पण अर्थात त्यासाठी भारतीय संघाला निदान २०० ते २५० धावा कराव्या लागतील.

स्कोअरबोर्ड

भारत (पहिला डाव) ४९.४ षटकांत १५० (के.एल. राहुल २६, ऋषभ पंत ३७, नितिश कुमार रेड्डी ४१, हेझलवूड २९-४, कमिन्स ६७-२, मार्श १२-२, स्टार्क १४-२) वि. ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) २७ षटकांत ७ बाद ६७ (मॅकस्वीने १०, हेड ११, कॅरे १९, बूमराह १७-४, सिराज १७-२, राणा ३३-१)

ऑस्ट्रेलिया ८३ धावांनी पिछाडीवर

Exit mobile version