भारताने चीन सीमेवर सैनिकांची तैनाती वाढवण्याचा मोठा निर्णय घेतलाय. जवळपास ५०,००० अतिरिक्त सैनिक भारत-चीन सीमेकडे हलवण्यात आले आहेत. भारताच्या या निर्णयाने चीनला चांगलीच धडकी भरलीय. चीनकडून सातत्याने होणारं अतिक्रमण आणि आक्रमक कुरापतींच्या पार्श्वभूमीवर भारताने हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. भारताने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच चीन सीमेवरील तणावाला पाकिस्तान सीमेपेक्षाही अधिक महत्त्व दिलंय. याआधी १९६२ मध्ये भारत चीनमध्ये युद्ध झालं असलं तरी यावेळचा हा निर्णय मोठा मानला जात आहे.
गलवान खोऱ्यात मागील दशकातील सर्वात धोकादायक झडप भारत-चीनमध्ये पाहायला मिळालीय. त्या पार्श्वभूमीवर भारताने आपलं लक्ष्य पाकिस्तानवरुन चीनवर केंद्रित केल्याचं पाहायला मिळत आहे. याआधी भारत-पाकिस्तानमध्ये देखील ३ घातक युद्ध झाली आहेत. मात्र, यावेळी भारताने आपला पारंपारिक शत्रू पाकिस्तानपेक्षाही अधिक लक्ष चीनवर दिलंय. त्याचाच भाग म्हणून मागील काही महिन्यात भारतानेही चीनला प्रत्युत्तर देत सीमेवर आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली. त्यासाठीच मागील काळात भारताने सीमेवर २०,००० सैनिकांची तैनाती केली. ही संख्या मागील वर्षीच्या तुलनेत ४० टक्के अधिक आहे. सध्या हा आकडा ५०,००० वर गेलाय.
भारतीय सैन्य किंवा सरकारच्या प्रवक्त्यांनी यावर बोलण्यास सध्या तरी नकार दिलाय. दरम्यान, याआधी भारतानेही चीनची कोंडी करण्यासाठी काही पावलं उचललं होती. त्याचाच भाग म्हणून सैन्याच्या अधिकाऱ्यांना बचावासाठी आक्रमक होण्याची मूभा देताना गरज पडल्यास चीनच्या भागावर नियंत्रणाचीही सूट देण्यात आलीय. त्यासाठी भारताने या भागात तोफांसह हेलिकॉप्टरची तैनातीही वाढवली. यामुळे सैनिकांना एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात हालचाल करण्याचीही सोपं होणार आहे.
हे ही वाचा:
बातमी मौलवीची, फोटो पुजाऱ्याचा
नरसिंह रावांना विसरले राहुल, प्रियांका
अनिल देशमुखांच्या अडचणींत का होणार आहे वाढ?
ट्विटरच्या चुकीला माफी नाही…कार्यकारी संचालकावर गुन्हा
दुसरीकडे चीनने मागील काही काळापासून भारत सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनाती वाढवलीय. मात्र, ही संख्या नेमकी किती आहे याची कोणतीही माहिती सध्या तरी उपलब्ध नाहीये. असं असलं तरी चीन तिबेटच्या बाजूने सैन्य तैनाती वाढवत असल्याचं भारतीय सैन्याच्या लक्षात आलंय. याशिवाय चीनकडून सीमेवर रस्ते, रेल्वेजाळं आणि बुलेटप्रुफ बंकर्स अशा मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभ्या केल्या जात आहे.