भारतातून हवाई सफर होणार पूर्ववत

भारतातून हवाई सफर होणार पूर्ववत

२७ मार्च पासून भारत सरकार मार्फत आंतरराष्ट्रीय विमानसेवा संपूर्ण क्षमतेने सुरु होणार आहे. भारत सरकारच्या केंद्रीय हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या मार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे. या आधी २०२० मध्ये मार्च महिन्यात कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर निर्बंध लावण्यात आले होते.

कोविड १९ च्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने केंद्रीय हवाई वाहतूक महासंचालनालयाने १९ मार्च २०२० रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, २३ मार्च २०२० पासून, भारतात येणाऱ्या आणि भारतातून परदेशी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विमानांच्या वाहतुकीवर निर्बंध घातले होते. पण आता कोरोना नियंत्रणात येताना दिसत असताना आणि लसीकरणाचे प्रमाण वाढत असताना सध्या, डीजीसीएच्या, २८ फेब्रुवारी २०२२ च्या परिपत्रकानुसार, भारतातून होणाऱ्या आणि भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांच्या प्रवासावरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम राहतील, असे म्हटले होते.

हे ही वाचा:

फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर पवारांनी आळवला जुनाच राग

सरकारी वकिलांचे कार्यालय की राजकीय कत्तलखाना!

मलिकांवर आरोप गंभीर, तरी पाठीशी पवार खंबीर

नवाब हटाओ! भाजपाचा आज मुंबईत विराट मोर्चा

जगभरात व्यापक प्रमाणात झालेले कोविड प्रतिबंधक लसीकरण लक्षात घेऊन आणि त्यानंतर सर्व हितसंबंधियाशी चर्चा केल्यावर केंद्र सरकारने भारतातून येणाऱ्या आणि भारतात जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय नागरी हवाई व्यावसायिक विमानसेवा येत्या २७ मार्च २०२२ पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या घालण्यात आलेले निर्बंध २६ मार्च २०२२ च्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत लागू असतील तसेच, एअर बबल व्यवस्था देखील तोपर्यंत लागू असेल.

आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक करतांना आरोग्य मंत्रालयाने दिनांक १० फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर केलेल्या नियमांचे संपूर्ण पालन करूनच केला जावा, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.

Exit mobile version