आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाचा आज स्कॉटलंड सोबत सामना रंगणार आहे. विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीतील भारताचा हा चौथा सामना असणार आहे. या सामन्यात भारतीय संघासाठी मोठे आव्हान नसले तरीही स्पर्धेत धावगती वाढवण्याच्या दृष्टीने भारतासाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.
आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीच्या ब गटात भारत सध्या चौथ्या स्थानावर आहे. या स्पर्धेतील भारताचे आव्हान अद्यापही संपलेले नाही. उपांत्य फेरीत दाखल होण्याच्या भारताच्या आशा धूसर झाल्या असल्या तरी पूर्णपणे संपुष्टात आलेल्या नाहीत. त्यामुळे आगामी दोन्ही सामने जिंकणे भारतीय संघासाठी महत्त्वाचे आहे.
सुपर १२ फेरीतील पहिले दोन सामने पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरोधात भारतीय संघाने गमावले. पण अफगाणिस्तान सोबतचा तिसरा सामना मोठ्या फरकाने जिंकल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहेच पण स्पर्धेतील धावगती ही सुधारली आहे. या सामन्यातून भारतीय फलंदाजी आणि गोलंदाजीत पुन्हा एकदा निखरून आली आहे. हीच विजयी घोडदौड आजच्या सामन्यातही सुरु ठेवण्याचा भारतीय संघाचा मानस असेल.
हे ही वाचा:
चिमुरडीने का लिहिले सरन्यायाधीशांना पत्र?
चार धाम देवस्थान बोर्ड होणार बरखास्त?
लक्ष्मीपूजन करतानाच कुटुंबावर अंदाधुंद गोळीबार! ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
भारत आपले आगामी दोन सामने स्कॉटलंड आणि नामिबिया या दोन देशांसोबत जिंकला आणि न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान किंवा नामिबिया या दोन संघांपैकी एक संघ विजयी झाला तर भारताला उपांत्य फेरीत दाखल होण्याची संधी आहे. अशा परिस्थितीत भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या तिन्ही संघांचे प्रत्येकी सहा गुण असतील. असे झाल्यास उपांत्य फेरीत दाखल होणाऱ्या संघाची निवड ही धावगतीच्या आधारे केली जाईल. त्यामुळे आगामी दोन सामन्यांमध्ये भारताला आपली धावगती शक्य तितकी वाढवणे महत्त्वाचे ठरणार आहे.