भारत कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना अत्यंत हिंमतीने करत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून विविध देशांनी भारताला सहाय्य केले आहे. इतके दिवस भारताला लसोत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल देखील द्यायला देखील आधी नकार दिलेल्या अमेरिकेने कच्चा माल तर पुरवलाच शिवाय आता ३१८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देखील दिले जात आहेत.
एअर इंडियाचे ए१०२ हे विमान न्यु यॉर्कच्या जॉन एफ. केनेडी विमानतळावरून या सामग्रीसह उड्डाण करणार आहे, आणि १५ तासांच्या सलग उड्डाणानंतर ते भारतात उतरणार आहे. हे विमान भारतात दिल्ली येथे उतरणार आहे. भारतात सध्या ऑक्सिजनचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यावर उपाय म्हणून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठवले जात आहेत.
हे ही वाचा:
कांगावाखोरांनी रोज सकाळी कांगावा करणं बंद करावं
पश्चिम बंगालमध्ये सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात
न्यु यॉर्कशिवाय अमेरिकेतील इतर अनेक ठिकाणांहून भारतासाठी मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. फिलीप्स ॲटलांटा येथून मिळालेल्या मदतीसोबतच सॅन फ्रान्सिस्को आणि नेवार्क येथून देखील भारतासाठी मदत पाठवली जाणार आहे.
अमेरिकेतील भारतीय दूतावास आणि एअर इंडियाला अमेरिकेतील अनेक सामाजिक संस्था आणि व्यक्तींकडून भारताला विविध प्रकारच्या वैद्यकीय उपकरणांची मदत पोहोचवण्याबाबत चौकशी केली जात असल्याचे समजले आहे. या महामारीच्या काळात भारतात ऑक्सिमीटर सारखी इतर उपकरणांची मदत देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अमेरिकेतील संस्थांसोबत व्यक्ती पुढे सरसावल्या आहेत.