भारत आपल्या शेजारील मित्रराष्ट्रांना कोविड लसीचा पुरवठा करणार आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रक काढून या विषयीची माहिती दिली आहे. भारताच्या शेजारील मित्रराष्ट्रांनी भारत सरकारकडे कोविड लसीच्या पुरवठ्यासाठी विनंती केली होती ज्याला भारत सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
भारताच्या ‘कोविशील्ड’ आणि ‘कोवॅक्सीन’ या दोन लसींना मान्यता मिळाल्यानंतर १६ जानेवारीपासून भारतात जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. भारताच्या मित्रराष्ट्रांनीही भारताकडे या दोन लसींच्या पुरवठ्यासाठी विनंती केली होती. भारत सरकारने ही विनंती मान्य केली असून २० जानेवारी रोजी भूतान, मालदिव्स, बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार, सियाचिल्स या देशांना लसीचा पुरवठा केला जाणार आहे. यापैकी भूतान आणि मालदिव्सला लसीचे डोस पाठवले असून बाकीच्या देशांनाही डोस पाठवले जाणार आहेत. श्रीलंका, अफगाणिस्तान आणि मॉरिशस या देशांनाही भारताकडून लस पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी त्या देशांकडून आवश्यक नियमावलींची पूर्तता होणे गरजेचे आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी ट्विट केले आहे. “जागतिक समुदायाच्या आरोग्यसुविधांची गरज भागवण्यासाठी भारत हा कायमच एक विश्वासू भागीदार राहिला आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.” असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये आहे.
India is deeply honoured to be a long-trusted partner in meeting the healthcare needs of the global community. Supplies of Covid vaccines to several countries will commence tomorrow, and more will follow in the days ahead. #VaccineMaitri https://t.co/9Czfkuk8h7
— Narendra Modi (@narendramodi) January 19, 2021
भारता प्रमाणेच या मित्रराष्ट्रांतही लसीकरण मोहीम टप्प्याटप्प्याने राबवली जाणारा आहे. पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि इतर आवश्यक घटकांना लसीकरण करण्यात येणार आहे. या देशांची स्थानिक गरज लक्षात घेऊन लस पुरवठाही टप्प्या टप्प्यात केला जाणार आहे.
संकटकाळी धावून जाणारा मित्र अशी कायमच भारताची ओळख राहिली आहे. कोविड सारख्या जागतिक महामारीच्या परिस्थितीतही भारताने आपली ही ओळख कायम ठेवत मित्र राष्ट्रांना मदतीचा हात दिला आहे. कोविड लसीच्या आधी भारताने हायड्रोक्लोरोक्विन, रेमेडेसिवीर, पॅरासिटामोल या औषधांचा आणि मास्क, व्हेंटिलेटर, ग्लव्स, कोविड चाचणीची साधने इत्यादी गोष्टींचा पुरवठा शेजारील मित्र राष्ट्रांना केला होता.