बांगलादेशने काही दिवसांपूर्वी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा ईशान्य भारताच्या क्षेत्रात चिनी अर्थव्यवस्थेचा विस्तार करण्याचे आवाहन चीनला केले होते. यामुळे भारताची कोंडी होण्याची शक्यता असताना आता भारताने महत्त्वाचा निर्णय घेत बांगलादेशला दणका दिला आहे. भारताने बांगलादेशला देण्यात आलेली एक महत्त्वाची ट्रान्सशिपमेंट सुविधा सरकारने रद्द केली आहे. याचा परिणाम बांगलादेशच्या व्यापार साखळीवर होणार आहे.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नवी दिल्लीने बांगलादेशच्या निर्यात कार्गोसाठी ट्रान्सशिपमेंट सुविधा बंद केली आहे. सीबीआयसीने ८ एप्रिल रोजीच्या आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, बांगलादेशातून निर्यात होणारा माल तिसऱ्या देशांमध्ये लँड कस्टम स्टेशन (एलसीएस) द्वारे बंदरे किंवा विमानतळांवर कंटेनर किंवा बंद ट्रकमध्ये पाठवण्याबाबत २९ जून २०२० रोजीचे त्यांचे पूर्वीचे परिपत्रक रद्द केले आहे. या पाऊलामुळे बांगलादेशचा भूतान, नेपाळ आणि म्यानमारसोबतचा व्यापार विस्कळीत होऊ शकतो. २०२० च्या परिपत्रकानुसार बांगलादेशातून निर्यात माल तिसऱ्या देशांमध्ये भारतीय बंदरे आणि विमानतळांकडे जाताना भारतीय लँड कस्टम स्टेशन वापरून ट्रान्सशिपमेंट करण्याची परवानगी देण्यात आली होती, जेणेकरून भूतान, नेपाळ आणि म्यानमार सारख्या देशांमध्ये बांगलादेशच्या निर्यातीसाठी व्यापार प्रवाह सुरळीत होईल.
भारताच्या या निर्णयामुळे बांगलादेशला दणका बसण्याची शक्यता आहे. व्यापार तज्ज्ञांच्या मते, ही सुविधा मागे घेतल्याने कापड, पादत्राणे, रत्ने आणि दागिन्यांसह अनेक भारतीय निर्यात क्षेत्रांना फायदा होण्याची शक्यता आहे. अशा भारतातील उद्योगांना बांगलादेश एक प्रबळ स्पर्धक आहे, विशेषतः वस्त्रोद्योगात.
हे ही वाचा :
पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना विजय दिवस परेडसाठी दिले आमंत्रण
‘वक्फ बोर्डा’चे समर्थन करणाऱ्या पक्षाला गावबंदी!
रामलल्लांचे सूर्य तिलक हे पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेचे फळ
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरवर भारताची रणनीती ठरली! काय म्हणाले एस जयशंकर?
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीचं बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस हे चीनच्या दौऱ्यावर असताना त्यांनी चीनच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार करण्यासाठी म्हणून धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या ईशान्य भारताच्या भागाचा वापर होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली होती. एकप्रकारे त्यांनी त्या भागात चीनने आपली अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी यावे, असे आमंत्रण दिले. भारतानेही याची दखल घेतली होती. शिवाय काही दिवसांनी लगेचच भारताकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
मुहम्मद युनूस यांनी अलिकडेच चीनच्या चार दिवसांच्या दौऱ्यात भारताच्या ईशान्येकडील सात राज्यांचे भूपरिवेष्टित असे वर्णन केले. शिवाय भारताला समुद्रापर्यंत पोहचण्यासाठी कोणताही मार्ग नाही आणि बांगलादेशचीचं या भगत पकड असल्याच्या आशयाचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे त्यांनी चीनला बांगलादेशमध्ये आपला आर्थिक पाया मजबूत करण्याचे आवाहन केले होते.