म्यानमार आणि थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉकला शुक्रवारी शक्तिशाली भूकंपाने हादरवून सोडले. या नैसर्गिक आपत्तीमध्ये म्यानमारमधील सुमारे १००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. यानंतर भारताने तातडीने म्यानमारला मदतीचे आश्वासन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत माहिती दिली. तसेच भारताने म्यानमारला ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत सुमारे १५ टन मदत पाठवली आहे. शिवाय पंतप्रधान मोदींनी म्यानमारच्या सरकार प्रमुखांशी चर्चा करून घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्यानमारमधील लष्कराच्या नेतृत्वाखालील सरकारचे प्रमुख मिन आंग ह्लाईंग यांना फोन केला. विनाशकारी भूकंपात म्यानमारमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेकारी देशाला पाठिंबा देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचीही पुष्टी केली. मोठ्या भूकंपामुळे झालेल्या विध्वंसाला तोंड देण्यासाठी भारत म्यानमारसोबत एकजुटीने उभा आहे, असेही मोदी म्हणाले.
“म्यानमारचे वरिष्ठ जनरल एचई मिन आंग ह्लाईंग यांच्याशी बोललो. विनाशकारी भूकंपात झालेल्या जीवितहानीबद्दल आमच्या तीव्र शोकसंवेदना व्यक्त केल्या. जवळचा मित्र आणि शेजारी म्हणून, भारत या कठीण काळात म्यानमारच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे. जलद प्रतिसाद म्हणून, भारताने ‘ऑपरेशन ब्रह्मा’ सुरू केले आहे, ज्या अंतर्गत आपत्ती मदत साहित्य, मानवतावादी मदत आणि शोध आणि बचाव पथके बाधित भागात जलद गतीने पाठवली जात आहेत,” असे मोदींनी एक्स वर पोस्ट केले.
Spoke with Senior General H.E. Min Aung Hlaing of Myanmar. Conveyed our deep condolences at the loss of lives in the devastating earthquake. As a close friend and neighbour, India stands in solidarity with the people of Myanmar in this difficult hour. Disaster relief material,…
— Narendra Modi (@narendramodi) March 29, 2025
हेही वाचा..
संभलमध्ये खुलेआम मटण विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार
हिंदू नववर्षाच्या भव्य स्वागतासाठी हिंदवी एकता मंचच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन
चीनची आव्हान : फिलिपिन्स, जपान आणि अमेरिका यांचा संयुक्त सैन्य सराव
आशीष सूद यांचा अरविंद केजरीवालांवर पलटवार
‘ऑपरेशन ब्रह्मा’ मोहिमेअंतर्गत म्यानमारला १५ टन मदत साहित्य आधीच पोहोचवण्यात आले आहे. हिंडन एअर फोर्स स्टेशनवरून आयएएफ सी- 130 या विमानाने ही मदत सामग्री म्यानमारला पाठवण्यात आली. मदत साहित्यात तंबू, स्लीपिंग बॅग्ज, ब्लँकेट, रेडी-टू-ईट जेवण, वॉटर प्युरिफायर, हायजीन किट, सोलर लॅम्प, जनरेटर सेट अशा वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय पॅरासिटामॉल, अँटीबायोटिक्स, कॅन्युला, सिरिंज, हातमोजे, कापसाच्या पट्ट्या आणि लघवीच्या पिशव्या यासारख्या वैद्यकीय गोष्टींचाही समावेश आहे.