खलिस्तान समर्थक दहशतवादी हरदीपसिंग निज्जरसाठी कॅनडाच्या संसदेमध्ये मौन राहून श्रद्धांजली वाहण्यात आल्याबद्दल भारतातर्फे शुक्रवारी याबाबत सडकून टीका करण्यात आली. अतिरेक्यांना राजकीय आश्रय देण्याच्या कोणत्याही कृतीला भारत सरकारचा तीव्र विरोध असेल, असे भारतातर्फे निक्षून सांगण्यात आले.
गेल्या वर्षी १८ जून रोजी सरे येथील गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये दोन अज्ञात व्यक्तींनी निज्जरची गोळ्या झाडून हत्या केली होती. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोप केला होता, ज्यामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक तणाव आणखी वाढला होता. निज्जर याच्या हत्येला १८ जून रोजी एक वर्ष झाल्यानंतर कॅनडाच्या संसदेत निज्जर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. या घटनेचा भारत सरकारने निषेध केला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करून भारताची भूमिका मांडली. ‘आम्ही पुन्हा एकदा सांगत आहोत की, खलिस्तानी कारवाया आमच्यासाठी गंभीर चिंतेचा विषय आहेत. आम्ही कॅनडा सरकारला त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वारंवार आवाहन करत आहोत. अतिरेकी भारतविरोधी घटकांना राजकीय आश्रय देणे आणि हिंसेचे समर्थन करणाऱ्यांना रोखून कॅनडा सरकारने कारवाई करणे अपेक्षित आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. कॅनडामध्ये खलिस्तानी ‘सिटिझन्स कोर्ट’ कार्यान्वित असल्याबद्दल भारत सरकारने दिल्लीतील कॅनडाच्या उच्चायुक्तालयात तीव्र निषेध व्यक्त केला असून त्यांना योग्य कारवाई करण्यास सांगितले आहे.
‘आम्ही येथील कॅनडाच्या उच्चायुक्तालयात तीव्र निषेध केला आहे. अशी न्यायालये किंवा मेळावे अजिबात उपयुक्त नाहीत. आम्ही हा मुद्दा त्यांच्याकडे जोरकसपणे मांडला आहे आणि त्यांना या प्रकरणी योग्य कारवाई करण्यास सांगितले आहे,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
हे ही वाचा:
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशात पेपफुटी विरोधातील कायदा लागू
ओबीसी आरक्षणप्रश्नी अधिवेशनात सर्वपक्षीय बैठक घेणार!
मुकेश अंबानींचा डीप फेक व्हिडीओ वापरून डॉक्टरची फसवणूक
भारत खेळणार बांग्लादेश, न्यूझीलंडविरोधात कसोटी मालिका
१८ जून रोजी कॅनडातील हाऊस ऑफ कॉमन्समधील कामकाजाच्या शेवटी अध्यक्ष ग्रेग फर्गस हे घोषणा करण्यासाठी उभे राहिले. ‘हाऊसमधील सर्व पक्षांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेनंतर, मला समजले की हरदीप सिंग यांच्या स्मरणार्थ एक क्षण मौन पाळण्याचा करार झाला आहे. आजच्याच तारखेला, एक वर्षापूर्वी ब्रिटिश कोलंबियाच्या सरे येथे निज्जरची हत्या झाली होती,’ असे ते म्हणाले. यानंतर सभागृहातील सदस्यांनी उभे राहून क्षणभर मौन पाळले.