रशिया युक्रेन यांच्यातील युद्धानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनमधील सुमी या शहरातून भारतीय दुतावासाच्या माध्यमातून बसेसनी तेथील विद्यार्थ्यांना आता बाहेर काढण्यात आले.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे की, सुमी या शहरातून ६९४ भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. त्या विद्यार्थ्यांना पोल्टवा येथे आणून तिथून त्यांना भारतात पाठविण्यात येईल. या विद्यार्थ्यांमध्ये भारतीयांसोबत नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तानमधील विद्यार्थीही आहेत, ज्यांना बाहेर काढले जात आहे.
या विद्यार्थ्यांसाठी १२ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. खरेतर त्यांना आदल्या दिवशीच बसने आणण्यात येणार होते पण युद्धविराम उठल्यामुळे त्यांना आणता आले नाही. मात्र पुन्हा एकदा युद्धविराम झाल्यानंतर बसेसमधून विद्यार्थ्यांना आणले गेले. आतापर्यंत १७ हजार भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात आले आहे.
सोमवारी पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी संपर्क साधला आणि ५० मिनिटे चर्चा केली. त्याशिवाय युक्रेनचे प्रमुख झेलेन्स्की यांच्याशीही त्यांनी चर्चा केली होती. त्यात विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सहाय्य करण्याची विनंती करण्यात आली होती.
हे ही वाचा:
भारताच्या ‘या’ कामगिरीसाठी पाक विद्यार्थीनीने मानले आभार
फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर पवारांनी आळवला जुनाच राग
महिला दिनाच्या दिवशीच महिला बचत गटाचे हॉटेल पेटवले!
‘काश्मीर फाईल्स’ रिलीजचा मार्ग मोकळा, हायकोर्टाने याचिका फेटाळली
सुमी शहरातील विद्यार्थ्यांकडील अन्नपदार्थ संपुष्टात आले होते. त्याशिवाय त्यांच्याकडील पैसेही संपले होते. त्यामुळे विद्यार्थी अडचणीत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मदतीसाठी आवाहन केले होते.
ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना वाचविण्याचे काम हाती घेतले आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर तिथे शिकण्यासाठी गेलेले विद्यार्थी अडचणीत सापडले. सुरुवातीला युद्ध सुरू होण्यापूर्वी भारताकडून या विद्यार्थी व नागरिकांना युक्रेन सोडण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या पण त्यावेळी विद्यार्थ्यांनी युक्रेनमध्येच राहणे पसंत केले होते. मात्र युद्ध सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना बाहेर पडणे अशक्य बनले.