पाकिस्तानकडून अनेकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर जम्मू- काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला जातो. प्रत्येकवेळी भारत पाकिस्तानला खडेबोल देखील सुनावतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकदा यावरून पाकिस्तानला शरमेने मान खाली घालावी लागली असली तरी पाकिस्तानकडून वारंवार हा मुद्दा अनावश्यकपणे उपस्थित केला जातो. आता पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सुधारणांवरील चर्चेदरम्यान जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल भारताने मंगळवारी पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला संबोधित करताना, भारताचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत पर्वतनेनी हरीश यांनी जम्मू आणि काश्मीरचा पाकिस्तानने वारंवार केलेला उल्लेख अनावश्यक असल्याचे सांगत हा प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील, असा पुनरुच्चार केला. “भारताला हे लक्षात घ्यावे लागत आहे की पाकिस्तानच्या प्रतिनिधीने पुन्हा एकदा भारतीय केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरवर अनावश्यक टिप्पणी केली आहे. अशा वारंवार उल्लेखांमुळे त्यांचे बेकायदेशीर दावे सिद्ध होत नाहीत किंवा त्यांच्या राज्य-पुरस्कृत सीमापार दहशतवादाचे समर्थन होत नाही,” असे हरीश म्हणाले.
हरीश पुढे म्हणाले, आम्ही पाकिस्तानला सल्ला देऊ की त्यांनी या व्यासपीठाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू नये. भारत सविस्तर प्रतिसाद देणार नाही परंतु भारताने भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी असेही अधोरेखित केले की पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरच्या काही भागांवर बेकायदेशीरपणे कब्जा करत आहे आणि त्यांना हा प्रदेश रिकामा करावाच लागेल. पाकिस्तानला सल्ला देतो की त्यांनी त्यांचा संकुचित आणि फुटीरवादी अजेंडा चालवण्यासाठी या मंचाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू नये.
हे ही वाचा :
धारावी सिलेंडर स्फोटांनी हादरली; रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकमधील सिलेंडरमध्ये स्फोट
कुणाल कामराला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक!
नागपूर: दोन रुपये चढ द्या, पण हिंदू माणसालाच बळ द्या!
संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेच्या भविष्यावरील सुरक्षा परिषदेच्या चर्चेदरम्यान पाकिस्तानी पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक सय्यद तारिक फतेमी यांनी जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर हरीश यांनी प्रत्युत्तर दिले. गेल्या आठवड्यातही, भारताने जिनेव्हा येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या (UNHR) बैठकीत पाकिस्तानला फटकारले आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप फेटाळून लावले होते. भारताने म्हटले आहे की, त्यांना पाकिस्तानसोबत सामान्य, शांततापूर्ण संबंध हवे आहेत परंतु दोन्ही राष्ट्रांमध्ये अर्थपूर्ण संवाद होण्यासाठी दहशतवाद आणि शत्रुत्वमुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे.