२३ सप्टेंबर : पाकिस्तानला धूळ चारणारा दिवस

भारत पाकिस्तान युद्ध भारतासाठी महत्वाचे ठरले कारण युद्धामुळे भारतीय सैन्याला पाकिस्तानची कुवत व त्यांच्या युद्धाच्या पद्धतीचा अंदाज आला.

२३ सप्टेंबर : पाकिस्तानला धूळ चारणारा दिवस

१९६५ मध्ये झालेले भारत पाकिस्तान युद्ध कोणताही भारतीय कधीच विसरू शकत नाहीच. पण २३ सप्टेंबर १९६५ हा दिवससुद्धा प्रत्येक भारतीयाच्या मनात कोरला गेला कारण या दिवशी भारताने पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवला होता. १९६५ च्या भारत पाक युद्धाने भारताची दिशाच बदलून गेली. या युद्धात अनेक जवानांनी प्राणांची आहुती दिली त्यामध्ये वीर अब्दुल हमीद यांचे नाव अग्रगण्य आहे. वयाच्या विसाव्या वर्षी सैन्यात दाखल झालेले हे अब्दुल हमीद १९६५ च्या युद्धाच्या वेळी रजेवर होते. मात्र, भारत पाक युद्धाची गंभीरता पाहून त्यांना परत येण्याचे आदेश देण्यात आले. त्यावेळी कर्तव्य बजावायला निघताना सामानाची बांधाबांध करत असताना त्यांच्या बॅगेचा पट्टा तुटला. तेव्हा त्यांच्या पत्नी रसूलन बीबीने या घटनेला अशुभ मानत अब्दुल हमीद यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु हमीद कर्तव्यापुढे थांबले नाहीत आणि या युद्धात त्यांनी मोठा पराक्रम गाजवला. अब्दुल हमीद यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले, अशा अनेक जवानांनी युद्धात आपल्या प्राणांची आहुती देत भारतासाठी २३ सप्टेंबर दिवसाचे महत्व वाढवले.

भारत पाकिस्तान हे युद्ध होण्यामागचं कारण काश्मीर विवाद असल्याचे सांगितले जाते. तसे काश्मीर हे पाकिस्तानात विलीन व्हावे ही सुप्त इच्छा १९४७-४८च्या युद्धानंतरसुद्धा पाकिस्तानची होतीच. काश्मीर काबीज करण्याचा १९४८ चा पाकचा केविलवाणा प्रयत्न भारताने उधळून लावला याची सल पाकिस्तानच्या मनात कायम होती. काश्मीर पाकिस्तानमध्ये यावे यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरूच होते आणि या संधीची वाट पाकिस्तान पाहतच होते. अखेर पाकिस्तानाला ती संधी मिळाली, असा पाकिस्तानचा भ्रम होता. १९६२ मध्ये चीनबरोबर झालेल्या युद्धात भारताला पराभव पत्करावा लागला होता. १९६२च्या पराभवानंतर भारतीय सेनेचे मनोबल खचले असेल आणि भारताचे नेतृत्व कणखर नसेल, असा आडाखा बांधला गेला होता.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमेरिकेने स्वतः मैत्रीचा हात पुढे करत भारतात अमेरिकन तळ मागवायचा प्रयत्न केला. मात्र, भारताने तो फेटाळून लावल्याने राजकीयदृष्ट्या अमेरिकेच्या मनात भारताविषयी द्वेष निर्माण झाला. त्याचदरम्यान, पाकिस्तानाने अमेरिकेला स्वतःहून तळ देऊ केल्याने अमेरिका पाकिस्तानवर खुश झाली आणि पाकिस्तानला मदत करू लागली. अमेरिका पाकिस्तानवर खुश असल्याने १९५४ मध्ये अमेरिकेने पाकिस्तानला रशियाविरुद्ध लढण्यासाठी आधुनिक शस्त्रसामग्री देऊ केली. यामुळे भारतापेक्षा पाकिस्तान शस्त्रसामग्रीमध्ये वरचढ झाला. पाकिस्तानला याचदरम्यान सीटो आणि सेंटो या दोन लष्करी करारांचे सदस्यत्व प्रदान करण्यात आले होते. यात भर पडली ती म्हणजे पाकिस्तानात १९५८ मध्ये लष्करी क्रांती घडवून लष्करप्रमुख अयुबखानाने सत्तेची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. भारताच्या दुर्दैवाने त्याचवेळी तिबेट आणि तिबेटचा सीमावर्ती भाग ह्या प्रश्नावरुन १९६२ साली भारताचा लष्करी पराभव करत चीनने जवळपास संपूर्ण तिबेटन पठार घशात घातले. भारत चीन युद्धाने भारत हा चीन आणि पाकिस्तानचा समान शत्रु झाला. परिणामी अमेरिका-पाक्-चीन अशी एक वेगळीच आघाडी भारताविरुद्ध उभी राहिली. पुढे १९६३ मध्ये पाकव्याप्त प्रदेशातील शासगम खोऱ्याचा भाग चीनला देऊन चीनला पाकिस्तानने खुश केले.

तर दुसरीकडे भारतात जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाल्याने लालबहादूर शास्त्री यांची भारताच्या प्रधानमंत्रीपदावर नेमणूक झाली होती. वारंवार जम्मू काश्मीरमध्ये मुख्यमंत्र्यांची बदली वगैरे कारणांमुळे राज्यात अस्थिर राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात भारत चीनविरोधातील युद्ध हरल्याने भारत कमकुवत झाला असल्याचा पाकिस्तानने गोड गैरसमज करून घेतला. त्यामुळे आठ वर्षांच्या कारकिर्दीनंतर सैल होत चाललेली देशावरील आपली पकड पुन्हा मजबूत करण्यासाठी ही योग्य वेळ वाटल्याने काश्मीरवर हल्ला करण्याचा अयुबखानाने निर्णय घेतला. अयुबखानाने युद्धाचे दोन टप्पे केले होते. पहिल्या टप्प्यात मे १९६५ मध्ये अर्ध्या कच्छवर हक्काचा दावा लावून हल्ला करायचा आणि भारताचा प्रतिसाद अजमावयाचा. त्याचबरोबर अमेरिकी शस्त्रास्त्रांची चाचणी घ्यायची. दुसऱ्या टप्प्यात काश्मीरवर कब्जा करण्याचा त्यांचा निर्धार होता.

भारत पाक फाळणीनंतर कच्छच्या भागाचा पाकिस्तनाला फायदा झाला कारण पाकिस्तानच्या बटालियनचे मुख्यालय याच भागात होते. या भागात पाकिस्तानने अठरा मैल लांब कच्चा रस्ता तयार केला होता. याची माहिती भारताला लागली आणि भारताने पाकिस्तानला विरोध करायला सुरुवात केली. कारण हाच कच्चा रस्ता काही ठिकाणी भारताच्या हद्दीत दीड मैलांपर्यंत आतमध्ये येत होता. भारताने पाकिस्तानला रस्ता तयार करण्यास विरोध केल्याने पाकिस्तानाने आक्रमक पवित्रा घेतला. भारतासाठी कच्छ ठिकाण म्हणजे दुर्गम भाग होता, याउलट पाकिस्तानला मात्र तिथे पोहचणे अतिशय सोपे होते याचा फायदा त्यांनी घेतला. भारतासाठी कच्छ पासून सर्वात जवळची ब्रिगेड म्हणजे ३१वी ब्रिगेड जी अहमदाबाद येथे होती. तसेच सर्वात जवळचे शहर म्हणजे भुज हे कच्छपासून १८० किमी लांब होते मात्र भारत पाक सीमेपासून ११० मैल लांब होते. या भागात पाकिस्तान लष्कराने गस्त घालण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे मार्च १९६५च्या अखेरीस भारताने कंजरकोटपासून अर्धा किमी व दक्षिण दिशेला सरदार चौकी तयार केली होती. याची माहिती पाकिस्तानला कळल्यावर त्यांनी आणखीनच आक्रमक पवित्र घेतला. पाकिस्तानच्या कमांडरने सैन्यला भारताची चौकी नष्ट करण्याचे आदेश दिले आणि यातूनच युद्धाला सुरुवात झाली. त्यानंतर २४ एप्रिल १९६५ रोजी विगोकोट व बिअरबेट चौक्यांवर पाकिस्तानी सेनेने हल्ले चढवले. पुढे मी १९६५ मध्ये कारगिल क्षेत्रात पाकिस्तान सैन्याने मर्यादित हल्ले चढवले. भारतीय सैन्याच्या १२१ इन्फन्ट्री ब्रिगेडने ते थोपवलेच, पण त्याशिवाय पॉइंट १३६२५ हा पाकिस्तानचा महत्त्वाचा मोर्चा जिंकला. त्यात पाकिस्तानी सैन्याची जबर जीवितहानी झाली. युद्धबंदीनंतर भारतीय सैन्याने घेतलेली दोन ठाणी परत करावी लागली.

लालबहादूर शास्त्री यांनी २८ एप्रिल १९६५ ला पाकिस्तानला इशारा दिला. भारताच्या सार्वभौमत्वावर पाकिस्तानने कोठेही आघात केला, तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रणनीतीचा अवलंब करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही. त्यानंतर मात्र पाकिस्तान नरम पडले. २९ जून १९६५ रोजी दोघांनी ब्रिटिश पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांच्या मध्यस्थीचा युद्धसमाप्तीचा तीन कलमी ठराव स्वीकारला. १ जुलैपासून युद्धबंदी, दोन्ही सेनांची १ जानेवारीच्या स्थितीपर्यंत माघार आणि आंतरराष्ट्रीय लवादाची नेमणूक, अशी ती तीन कलमे होती.

मात्र, योजनेनुसार अयुबखानाने घुसखोरीकरवी काश्मीरवर कब्जा करण्याची कारवाई १ ऑगस्टपासून सुरू केली. भारतावर आक्रमण करणाऱ्या मुस्लिम सेनापतींची नावे दिलेल्या आठ टोळ्यांनी वेगवेगळ्या मार्गाने काश्मीर खोऱ्यात प्रवेश करून श्रीनगरचा ताबा घ्यायचा, हे यामागील प्रमुख उद्दिष्ट होते. घुसखोरीची बातमी लागल्यावर भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. बारा दिवस चाललेली पाकिस्तानची ही कारवाई कोणतेही उद्दिष्ट साध्य न करता फसली होती. पाकिस्तानच्या फसलेल्या घुसखोरीविरुद्ध प्रत्याघात करण्यासाठी भारतीय सैन्याच्या ६८ माउंटन ब्रिगेडने उरी-पूंच्छ रस्त्यावरील हाजीपीर खिंड जिंकून घेण्याची मोहीम हाती घेतली. पुन्हा अटीतटीच्या लढाईनंतर हाजीपीरवर कब्जा करण्यात भारतीय सैन्य यशस्वी झाले.

पराभवामुळे संतापून गेलेल्या अयुबखानाने युद्धबंदी रेषा आणि आंतरराष्ट्रीय रेषा या दोन्हींना संलग्न असलेल्या छांब-जौरीया क्षेत्रावर करायची व जम्मू आणि काश्मीर विभागांना जोडणाऱ्या अखनूर पुलापर्यंत धडक मारून तो पूल काबीज करायचा. तसेच त्याकरवी दोन भागांमधील संपर्क तोडण्याची महत्त्वाकांक्षी कारवाई हाती घेण्याचे त्याने आदेश दिले. १ सप्टेंबरला सुरू झालेल्या या मोहिमेला प्रारंभी यश लाभले आणि छांब-जौरीया क्षेत्रातून भारतीय सैन्याच्या तुकड्यांना माघार घ्यावी लागली. परंतु ६ सप्टेंबरपर्यंत भारतीय लष्कराने हे आक्रमण थोपवून धरले. पाकिस्तानने युद्धबंदी रेषा ओलांडल्यावर लागलीच भारतीय वायुसेनेने युद्धक्षेत्रात प्रवेश केला आणि भारताच्या नॅट विमानांनी त्यांच्यापेक्षा सरस असलेल्या आधुनिक सेबर विमानांची अक्षरशः चाळण केली. त्यानंतर पाकिस्तान सैन्याच्या तुकड्यांना माघारी नेऊन इतरत्र तैनात करण्यात आले. सीमेवरील छांब मात्र पाकिस्तानी सैन्याच्या हातात राहिले.

भारत आणि पाकिस्तानने हे युद्ध वाढवू नये म्हणून राष्ट्रसंघाचे अध्यक्ष उ थांट यांनी स्वतः दोन्ही देशांना भेट दिली. त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय दबाव आल्यामुळे २३ सप्टेंबर रोजी दोन्ही देशांच्या संमतीने युद्धबंदी जाहीर करण्यात आली. या युद्धात भारत पाकिस्तानपेक्षा वरचढ ठरला. अयुबखानाने जी योजना आखली होती ती भारतीय सैन्याने हाणून पडल्याने भारताचा विजय झाला. हे युद्ध भारतासाठी महत्वाचे ठरले कारण युद्धामुळे भारतीय सैन्याला पाकिस्तानची कुवत व त्यांच्या युद्धाच्या पद्धतीचा अंदाज आला.

Exit mobile version