मालदीव सरकारने पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तीन मंत्र्यांची हकालपट्टी केल्यानंतर खुद्द मालदीवमध्येही चिंतेचे सावट पसरले आहे. मालदीवच्या पर्यटनव्यवसायात भारताचा मोठा वाटा असतानाच, मालदीवचे नागरिकही भारतावर आरोग्य पर्यटनासाठी सर्वाधिक अवलंबून आहेत. त्यामुळे दोन्ही देशांतील बिघडलेल्या द्विपक्षीय संबंधांचा विपरित परिणाम त्यांच्यावरही होण्याची भीती व्यक्त होत आहे.
मालदीवच्या मंत्र्यांनी गरळ ओकल्यानंतर देशातील अनेक सर्वसामान्य नागरिकांनी भारताची माफी मागितली आहे. ‘मी माझ्या सर्व भारतीय मित्रांची क्षमा मागतो. मला आधीच बुक केलेल्या भारताच्या कौटुंबिक वैद्यकीय सहलीची चिंता वाटू लागली आहे. तुम्ही तुमच्या वैद्यकीय समस्येसाठी सिंगापूर किंवा कुठेही जाऊ शकता. मात्र याचा अर्थ असा नव्हे की आम्हीही तसेच करू शकतो,’ अशी प्रतिक्रिया एका मालदीव नागरिकाने दिली आहे.
वैद्यकीय मदतीसाठी भारतावर निर्भर
मालदीवमध्ये स्थानिक आरोग्य यंत्रणा सक्षम असली तरी विशेष वैद्यकीय उपचारांसाठी आणि शस्त्रक्रियेसाठी मालदीवच्या नागरिकांची पहिली पसंती भारतालाच असते. सन २०१५च्या इंडियन मेडिकल टुरिझम इंडस्ट्री आऊटलूक अहवालानुसार, मालदीवचे नागरिक हे भारतातील आरोग्यसेवेचे पहिल्या पाच क्रमांकाचे लाभार्थी आहेत. सन २०२१मध्ये भारतात वैद्यकीय उपचारासाठी भेट देणाऱ्यांमध्ये मालदीव तिसऱ्या क्रमांकावर होता, अशी माहिती सरकारनेच दिली होती. मालदीवमध्ये डॉक्टर आणि तज्ज्ञ डॉक्टर पुरवण्यातही भारताची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. तसेच, मालदीवमधील वैद्यकीय व्यावसायिकांना भारताकडून वेळोवेळी प्रशिक्षणही दिले जाते.
वैद्यकीय पर्यटनासाठी भारताला प्राधान्य
पोहोचण्यासाठी लागणारा कमी कालावधी, ओळखीचा असणारा देश आणि माफक दरातील उपचार आदी कारणांसाठी मालदीवचे नागरिक वैद्यकीय उपचारांसाठी श्रीलंका आणि भारताला प्राधान्य देतात. तसेच, भारतात हृदय शस्त्रक्रिया, कर्करोगावरील उपचारासाठी अद्ययावत वैद्यकीय सुविधा आहेत. तसेच, भारतात जागतिक दर्जाचे डॉक्टर आणि रुग्णालये आहेत. ज्यामध्ये अन्य देशांच्या तुलनेत माफक दरात उपचार होतात.
हे ही वाचा:
विदेशात नोकरीचे अमिष दाखवून करीत होते फसवणूक
राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पदभार स्वीकारला
मालदीववरून शरद पवार मोदींच्या पाठीशी!
झारखंडमध्ये अज्ञातांकडून मंदिरातील मूर्तींची तोडफोड!
करोनाकाळात वैद्यकीय मदत
करोनाकाळात भारताने मालदीवला २५ कोटी अमेरिकी डॉलरची आर्थिक मदत केली आहे. ही करोनाकाळात कोणत्याही देशाने केलेली सर्वांत मोठी आर्थिक मदत मानली जाते. तसेच, भारताने त्यावेळी वैद्यकीय पथकही मालेमध्ये पाठवले होते. त्यामध्ये फुप्फुसतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ आणि लॅब तंत्रज्ञांचा समावेश होता. तसेच, भारताने एप्रिलमध्ये साडेपाच टन अत्यावश्यक औषधांचा पुरवठाही केला होता. त्यानंतर ६.२ टन औषधांचा पुरवठा केला होता. शिवाय, मेमध्ये ५८० टन अन्नपदार्थांची मदत मालदीवला पाठवण्यात आली होती. तर, भारताने जानेवारी २०२१मध्ये भारतात बनलेल्या एक लाख करोना लशी मालदीवला पाठवल्या होत्या.