अखेर भारताने चिनी ड्रॅगनला नमवले

अखेर भारताने चिनी ड्रॅगनला नमवले

अनेक महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काल (१० फेब्रुवारी) रोजी अखेर तोडगा निघाला आहे. या विषयावर आज भारत सरकार कडून अधिकृतपणे पहिल्यांदा भाष्य करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज राज्यसभेत या विषयी संसदेला आणि देशाला माहिती दिली.

मागील अनेक दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये द्विपक्षीय चर्चा सुरु होती. मात्र, दोन्ही देश आपल्या भूमिकांवर ठाम होते. त्यामुळे सीमेवरील तणावावर मार्ग निघत नव्हता. अखेर दोन्ही देशांनी सीमेवर ‘जैसे थे’ स्थिती ठेवत आपआपले सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतला. याबाबत दोन्ही सैन्यात करारही झाला. याचा व्हिडीओ देखील प्रकाशित करण्यात आला आहे.

“चीनकडून मागील वर्षी एप्रिल, मे 2020 दरम्यान पूर्व लडाखच्या सीमेजवळ मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि सैन्य गोळा करण्यात आलं होतं. या भागात चीनने आपलं सैन्य तैनात केलं. त्याला भारताने देखील उत्तर दिलं होतं. चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना संसदेने देखील अभिवादन केलं होतं. मी आज संसदेला त्याबाबत झालेल्या घडामोडींची माहिती देऊ इच्छितो. मागील वर्षी सप्टेंबरपासून दोन्ही देशांनी सैन्य आणि राजनैतिक पातळीवर चर्चा सुरु आहे. सध्या दोन्ही देश शांततापूर्ण पद्धतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.” असे राजनाथ सिंग यांनी संसदेत सांगितले.

“सीमेवर दोन्ही देशाच्या सैन्यांने माघार घ्यावी आणि जी स्थिती आहे ती तशीच ठेवावी (स्टेटस को) यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यामुळे शांतता प्रस्थापित होईल. चीनने १९६२ पासून लडाखमधील ३८ हजार चौरस किलोमीटरचा प्रदेश अनधिकृतपणे बळकावला आहे. याशिवाय पाकिस्तानने भारताची ५१८० हजार चौरस किमी जमीन अनधिकृतपणे बळकावत चीनला दिलीय. अशाप्रकारे चीनने 43 हजार चौरस किमीपेक्षा अधिक भागावर अनधिकृतपणे अतिक्रमण केलं आहे.” असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.

“चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर देखील अनेक चौरस किमी भागाला आपलाच असल्याचा दावा करतो. भारताने चीनच्या या अनधिकृत दाव्यांना कधीही मान्य केलेलं नाही.” असेही त्यांनी नमूद केले.

राजनाथ सिंह म्हणाले, “गेल्यावर्षी चीनने केलेल्या कृतीमुळे सीमेवरील शांतता भंग झाली होती. त्यामुळे चीन आणि भारताच्या संबंधांवरही परिणाम झाला. मी स्वतः सप्टेंबर २०२० मध्ये चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा केली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल यांनी देखील आपल्या समकक्षांसोबत बैठका केल्या आहेत.”

Exit mobile version