भारताला नमवून श्रीलंकन महिलांनी मिळविला आशिया चषक

श्रीलंकेचा पहिलाच आशियाई विजय

भारताला नमवून श्रीलंकन महिलांनी मिळविला आशिया चषक

आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय महिला क्रिकेट संघाला श्रीलंकेकडून हार सहन करावी लागली. श्रीलंकेने ८ विकेट्सनी हा विजय मिळवित आशिया चषकावर नाव कोरले तर आशिया चषक जिंकण्याची ही श्रीलंका महिला संघाची पहिलीच वेळ ठरली.

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळा अंतिम फेरीत पराभूत होण्याची वेळ भारतावर आली. एकदा वनडेत भारताला हार मानावी लागली तर आता टी-२० स्पर्धेत भारत पराभूत झाला. याआधी वनडेत भारत बांगलादेशविरुद्ध २०१८मध्ये अंतिम फेरीत पराभूत झाला होता.

भारताने श्रीलंकेसाठी १६६ धावांचे लक्ष्य दिले होते. श्रीलंकेने केवळ २ फलंदाज गमावून हे लक्ष्य पूर्ण केले. चमारी अटापट्टू आणि हर्षिता समरविक्रमा यांच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेने हा विजय मिळविला. अटापट्टूने ४३ चेंडूंत ६१ धावांची खेळी केली त्यात ९ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. समरविक्रमाने ५१ चेंडूंत ६९ धावांची नाबाद खेळी केली. त्यात सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.

हे ही वाचा:

मनू भाकर म्हणते, श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या मार्गावर चालले!

रमिता जिंदालची चमकदार कामगिरी, १० मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत प्रवेश !

विधानपरिषदेतील नवनिर्वाचित ११ उमेदवारांनी घेतली शपथ !

नेमबाज मनू भाकरने रचला इतिहास, कांस्य पदकावर कोरले नाव !

दुसऱ्या विकेटसाठी या दोघींनी ८७ धावांची भागीदारी केली. तिथेच भारताविरुद्ध त्यांनी विजयाचा पाया भक्कम केला. दोघींनीही अत्यंत संयमाने खेळ केला. अटापट्टूने मुक्त फलंदाजी केली तर समरविक्रमाने रिव्हर्स स्विप आणि मोकळ्या जागेत चेंडू ढकलून धावफलक हलता राहील याची काळजी घेतली. अटापट्टू बाद झाल्यावर कविशा दिलहारीने समरविक्रमाला साथ दिली. दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची अभेद्य भागीदारी केली.

त्याआधी, स्मृती मानधनाच्या ६० धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने ६ बाद १६५ धावा केल्या. त्यात १० चौकारांचा समावेश होता. जेमिमा रॉड्रिग्ज (२९) आणि रिचा घोष (३०) यांनीही उपयुक्त धावा केल्या. पण श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजीपुढे भारताच्या धावांची गती वाढली नाही. मानधनाला सोडले तर भारताच्या मधल्या फळीला धावा करताना बराच संघर्ष करावा लागला.

श्रीलंकेची शिस्तबद्ध गोलंदाजी आणि नंतर केलेली संयमी फलंदाजी या जोरावर श्रीलंकेला हा ऐतिहासिक विजय मिळविता आला.

Exit mobile version