पाकिस्तानने नोंदविला वर्ल्डकप क्रिकेटमधील भारताविरुद्धचा पहिलावहिला विजय

पाकिस्तानने नोंदविला वर्ल्डकप क्रिकेटमधील भारताविरुद्धचा पहिलावहिला विजय

वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तानने भारतीय संघावर विजय मिळविण्याचा पराक्रम रविवारी केला. दुबईत सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यातच भारतावर पाकिस्तानने १० विकेट्स राखून शानदार विजय मिळविला. आतापर्यंतच वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारत अजिंक्य, अपराजित होता, पण तो इतिहास रविवारी बदलला.

रविवारचा दिवस भारताचा नव्हता. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि तेव्हापासून सगळेच चित्र भारताच्या विरोधात जाऊ लागले. फलंदाजीला उतरलेल्या भारताला पहिले दोन धक्के झटपट लागले. रोहित शर्मा (०) आणि के.एल. राहुल (३) हे बाद झाले आणि भारताच्या फलंदाजीला ओहोटी लागली.

विराट कोहलीचा (५७) अपवाद वगळता केवळ ऋषभ पंतने ३९ धावांची खेळी करून भारताला सावरले. बाकी भारतीय फलंदाजी ही फक्त कागदावरच श्रेष्ठ असल्याचे दिसले. सूर्यकुमार यादव (११), रवींद्र जाडेजा (१३). हार्दिक पंड्या (११) यांच्याकडून साफ निराशा झाली. भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १५१ धावा केल्या. त्याला उत्तर देताना पाकिस्तानने एकही विकेट न गमवता हे निर्धारित लक्ष्य पार केले. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने ७९ धावा तर कर्णधार बाबर आझमने ६८ धावांची खेळी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १५२ धावांची भागीदारी केली.

दवाचा फटका भारतीय संघाला बसला. दुबईत प्रकाशझोतात खेळविल्या गेलेल्या या सामन्यात नंतर पडलेले दव भारतीय गोलंदाजीची धार बोथट करणारे ठरले. शिवाय, फलंदाजीतील अतिआत्मविश्वासही भारतीय संघाला नडला.

 

हे ही वाचा:

अंधेरीत चोरांनी केले २५ मॅनहोल झाकणमुक्त

‘महाविकास आघाडी सरकारच आऊटसोर्स करण्याची आली वेळ’

संजय राऊत, ट्विट करण्यापूर्वी व्हिडीओची सत्यता तर पडताळा!

‘समीर वानखेडे मागासवर्गीय असल्यानेच त्यांना टार्गेट केलं जातंय’

 

भारताची पुढील लढत न्यूझीलंडशी होणार असून हा सामना ३१ ऑक्टोबरला होईल. त्यानंतर अफगाणिस्तान (३ नोव्हेंबर), स्कॉटलंड (५ नोव्हेंबर) आणि नामिबिया (८ नोव्हेंबर) अशाही लढती आहेत.

स्कोअरबोर्ड

भारत ७ बाद १५१ (विराट कोहली ५७, ऋषभ पंत ३९, शाहीन आफ्रिदी ३१-३, हसन अली ४४-२) पराभूत वि. पाकिस्तान बिनबाद १५२ (मोहम्मद रिझवान ना. ७९, बाबर आझम ना. ६८). सामनावीर : शाहीन शाह आफ्रिदी

Exit mobile version