‘या’ देशाला दिली भारताने १ अब्ज डॉलरची मदत

‘या’ देशाला दिली भारताने १ अब्ज डॉलरची मदत

भारताने नेहमीच शेजारी देशांना मदतीचा हात दिला आहे. फक्त शेजारीलच नव्हे तर जगभरातील अनेक देशांना गरजेवेळी मदतीचा हात पुढे केला आहे. आता आणखी एका छोट्या देशाला भारताने भरघोस आर्थिक सहाय्य केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याबद्दल माहिती दिली आहे.

भारताने शेजारील देश श्रीलंकेला मदतीचा हात पुढे केला आहे. गुरुवार, १७ मार्च रोजी श्रीलंकेसाठी भारताने एक अब्ज डॉलर्सच्या कर्जाची लाइन ऑफ क्रेडिटची घोषणा केली आहे. क्रेडिट लाइन वाढवण्याच्या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, भारत नेहमीच श्रीलंकेमधील लोकांच्या पाठीशी उभा राहिला आहे. तसेच शक्य ती सर्व मदत भारत करत राहणार असल्याचेही ते म्हणाले.

श्रीलंकेचे अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांना भेट देऊन स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मार्फत एक अब्ज डॉलर्सच्या क्रेडिट लाइनच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत अर्थ मंत्रालयात स्वाक्षरी समारंभ पार पडला. अन्न, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी ही मदत करण्यात आली आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. तर शेजारधर्म प्रथम असे म्हणत त्यांनी भारत भारत नेहमी श्रीलंकेसोबत उभा राहील असे म्हटले आहे.

गेल्या महिन्यात, भारताने श्रीलंकेला पेट्रोलियम उत्पादने खरेदी करण्यासाठी मदत म्हणून क्रेडिट लाइन विस्तारित केली होती. श्रीलंका सध्या गंभीर परकीय चलन आणि ऊर्जा संकटात सापडला आहे. महागाईने या देशात टोक गाठलं असून युक्रेन रशिया युद्धाचा परिणाम या देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे.

Exit mobile version