५जी मध्येही भारत आत्मनिर्भर होणार

५जी मध्येही भारत आत्मनिर्भर होणार

केंद्रीय दूरसंचार आणि तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी भारतीय दूरसंचार कंपन्यांना ५जी तंत्रज्ञानासाठी भारतीय उपकरणे वापरण्याचा आग्रह केला आहे. विशेषतः या तंत्रज्ञानासाठी वापरायचे गाभ्याचे उपकरण (कोअर) हा भारतीय बनावटीचाच असावा असा आग्रह मंत्री महोदयांनी धरला आहे.

नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर सर्विसेस (एनआयसीएसआय) येथे बोलताना यांनी सांगितले की ५जी तंत्रज्ञानाची चाचणी घेण्याची तयारी पूर्ण झालेली आहे. आता मंत्रालय लवकरच चाचणी घेण्याची परवानगी देईल.

“आपण २जी, ३जी आणि ४जी तंत्रज्ञानात मागे पडलो, मात्र आता ५जी बाबत आपल्याला जगाच्या पुढे जायचे आहे. आम्ही चाचणीपूर्व तयारी पूर्ण केली आहे आणि लवकरच चाचणी घेण्यासाठी परवानगी देऊ.” असे रवि शंकर प्रसाद यांनी सांगितले आहे. मात्र यावेळी याचा गाभा पूर्णपणे भारतीय असला पाहिजे यावर त्यांनी जोर दिला.

५जी नेटवर्क द्वारे होणारे प्रत्येक संभाषण एन्क्रिप्टेड असते आणि ते कोअरमध्ये साठवले जाते. हे कुठल्याही केंद्रावरून वाचले जाऊ शकत नाही. त्यामुळे हे उपकरण भारतीय बनावटीचे असणे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. भारत विश्वसनीय कोअर उत्पादकांची यादी बनवत आहे. त्यामुळे भारतीय कोअर उत्पादकांना देखील चालना मिळेल. या उत्पादकांकडून हा कोअर भारतीय दुरसंचार कंपन्यांना घेता येईल. हुआवेई आणि झेडटीई या चीनी कंपन्यांकडून करण्यात आलेल्या सायबर हेरगिरीच्या प्रकरणांनंतर भारत सावध झाला आहे.

भारतातील ‘भारती एअरटेल’ या कंपनीने भारतात ५जी तंत्रज्ञानाची चाचणी करण्याची तयारी पूर्ण केली आहे. मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर कंपनी चाचणी घेईल.

हे ही वाचा:एयरटेल ५जी सज्ज

Exit mobile version