रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये सुरू असलेलं युद्ध शमण्याची चिन्हं दिसत नसताना रशियन फेडरेशनचे संरक्षण मंत्री आणि भारताचे संरक्षण मंत्री यांनी फोनवरून चर्चा केली. युक्रेनमधील परिस्थितीवर दोन्ही देशांच्या मंत्र्यांनी चर्चा केली. तसेच युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात ‘डर्टी बॉम्ब’ वापरण्याच्या कथित धोक्याबद्दल देखील चिंता व्यक्त केली.
रशियन फेडरेशनचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांच्या विनंतीनुसार भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवार, २६ ऑक्टोबर रोजी त्यांच्याशी फोनवरून संभाषण केले. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्य तसेच युक्रेनमधील बिघडलेल्या परिस्थितीवर चर्चा केली. रशियाचे संरक्षण मंत्री शोईगु यांनी राजनाथ सिंह यांना युक्रेनमधील निर्माण होत असलेल्या परिस्थितीची माहिती दिली. तसेच ‘डर्टी बॉम्ब’च्या वापराच्या माध्यमातून संभाव्य चिथावण्यांविषयी त्यांनी माहिती दिली.
त्यानंतर राजनाथ सिंह त्यांनी या मुद्द्यावर संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग अवलंबण्याच्या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. आण्विक किंवा अणुऊत्सर्जनीय शस्त्रे वापरण्याची शक्यता मानवतेच्या मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध असल्याने आण्विक पर्यायाचा कोणत्याही बाजूने अवलंब करू नये, असा सल्ला राजनाथ सिंह यांनी यावेळी रशियन संरक्षण मंत्र्यांना दिला.
दरम्यान, शोईगु यांनी रविवारी या विषयावर नाटोच्या संरक्षणमंत्र्यांशी अनेकदा चर्चाही केली होती. तर किरणोत्सर्गी धोकादायक बॉम्ब वापरण्याच्या तयारीत असल्याचा रशियाचा आरोप युक्रेन आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी फेटाळला आहे.
हे ही वाचा:
सितरंग चक्रीवादळाचा कहर, बांगलादेशात ७ जणांचा मृत्यू
जो बायडन यांच्या उपस्थितीत व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा जल्लोष
म्यानमारमध्ये लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू
ब्रिटनची गडगडलेली अर्थव्यवस्था सावरायला भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधानपदी
‘डर्टी बॉम्ब’ हा एक धोकादायक बॉम्ब असून यामध्ये किरणोत्सारी घटकांचा वापर केला जातो. डर्टी बॉम्ब हा अणुबॉम्बएवढा विध्वंसक नसला तरी या बॉम्बमध्ये मोठं नुकसान करण्याची क्षमता आहे. डर्टी बॉम्बच्या स्फोटानंतर यातील विषारी घटक हवेत पसरतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतो.