बुधवारी संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात सांगितल्यानुसार कर्नाटक राज्यातल्या मांड्या जिल्ह्यात १६०० टन लिथियमचे साठे सापडले आहेत.
मारलागल्ला- अल्लापटना या भागाचे भूपृष्ठीय आणि अर्ध-भूपृष्ठीय सर्वेक्षण ऍटोमिक मिनरल्स डिरेक्टोरेट तर्फे उत्खननासाठी करण्यात आले आहे. ऍटोमिक एनर्जी विभागाच्या अंतर्गत असलेल्या या शाखेने यावर संशोधन केले आहे.
लिथियम हा अनेक उत्पादनांसाठी लागणारा महत्त्वाचा घटक आहे. सिरामिक, काच यांप्रमाणेच दूरसंचार क्षेत्रातील तसेच अवकाश संशोधन क्षेत्रातील संस्थांच्या विविध उत्पादनांसाठी लिथियमचा वापर केला जातो.
लिथियमचा सर्वात जास्त वापर बॅटरी बनवण्यासाठी केला जातो. सध्याच्या काळात, भारत जेव्हा स्वदेशी बॅटरींचे उत्पादन करू शकणार आहे, त्यावेळेला बॅटरीचा महत्त्वाचा घटक असलेले लिथियम उत्पादन भारतात होणार आहे. खासकरून इलेक्ट्रिक गाड्यांमधल्या बॅटरीकरता लिथियम आवश्यक असते.
यासोबतच, मोठ्या प्रमाणात लिथियम वंगण, अधिक उर्जा असलेले इंधन बनविण्यासाठी, मोबईलच्या काही भागांकरिता वापरले जाते.
भारत सरकार इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन देत असताना देशांतर्गत लिथियमचे साठे सापडणे हे फायद्याचे आहे. नुकत्याच शोधल्या गेलेल्या या साठ्यांवर अधिक संशोधन होणे बाकी आहे. ते झाल्यानंतर या साठ्यांच्या उत्खननाला परवानगी दिली जाईल. त्यानंतर या साठ्यांचा व्यापारी उपयोग करणे शक्य होईल.