भारताने आपल्या कंदाहार येथील वाणिज्य दुतावातासून सुमारे ५० अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांना बाहेर काढले आहे. अफगाणिस्तानातील ढासळत्या सुरक्षेच्या कारणास्तव भारताने हे पाऊल उचलले आहे. अफगाणिस्तानातील अनेक भागांमध्ये तालिबानचे वर्चस्व वाढत आहे, त्यामुळे तेथील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
हवाई दलाने विशेष मोहिम राबवून भारतीय दुतावासातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. रविवारी केल्या गेलेल्या या मोहिमेतून दुतावासातील कर्मचारी वर्ग, अधिकारी आणि त्याबरोबरच इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस कर्मचारी यांना देखील बाहेर काढण्यात आले. अफगाणिस्तानातील सुरक्षेच्या कारणास्तव भारताने कंदाहारमधील वाणिज्य दुतावास तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तालिबानने वेगाने अफगाणिस्तानच्या मोठ्या भागावर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले आहे. अफगाणिस्तानातील अनेक प्रमुख शहरे आणि विभाग, त्याबरोबरच पश्चिम अफगाणिस्तानातील अनेक भाग तालिबानच्या ताब्यात गेले आहेत.
मंगळवारी काबुल येथील भारतीय दुतावासाने अफगाणिस्तानातील कंदाहार आणि मझर-ए-शरिफ येथील वाणिज्य दुतावास, त्याबरोबरच काबुलचा दुतावास बंद करण्याचा विचार नसल्याचे सांगितले होते.
दोनच दिवसांपूर्वी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने, अफगाणिस्तानातील ढासळत्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि त्याचा तेथील भारतीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या परिणामावर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले होते. त्याबरोबरच तेथील परिस्थितीनुरूप निर्णय घेण्यात येईल असे देखील परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले होते.
हे ही वाचा:
विधानसभा अध्यक्ष पदावर जाधवांचा डोळा, पण काँग्रेसने फिरवला बोळा
उत्तर प्रदेशात ‘चप्पा चप्पा भाजपा’…ब्लॉक अध्यक्ष निवडणुकीत घवघवीत विजय
ईदसाठी भिवंडीतले कत्तलखाने पुन्हा सक्रिय? दोन गायी चोरल्याची घटना
विधानसभा अध्यक्ष पदावर जाधवांचा डोळा, पण काँग्रेसने फिरवला बोळा
अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घ्यायला सुरूवात केल्यानंतर अफगाणिस्तानात काही दहशतवादी हल्ले व्हायला सुरूवात झाली आहे. मागिल काही आठवड्यांपासून या प्रकारांत वाढ होत आहे. अमेरिकेने ऑगस्टच्या शेवटापर्यंत अफगाणिस्तानातून संपूर्ण सैन्य काढून घेणार असल्याचे सांगितले आहे.
या नंतर अफगाणिस्तानातील वाढत्या हिंसाचारामुळे मझार-ए-शरिफ या बाल्ख प्रांताची राजधानी असलेल्या शहरातून आणखी दोन देशांनी त्यांचे वाणिज्य दुतावासात बंद केले आहे.
अफगाणिस्तानातील वाढत्या अस्थिरतेबाबत भारतातील अफगाणिस्तानचे राजदुत फरिद मामुंदझे यांनी परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रींगला यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी अफगाणिस्तानातील परिस्थितीबाबत श्रींगला यांना सविस्तर माहिती दिली होती.
या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानातील भारतीय दुतावासाने सुरक्षेच्या सुचना जारी केल्या आहेत. त्यांनी अफगाणिस्तानात असलेल्या किंवा येणाऱ्या लोकांना काळजी घेण्याची सुचना दिली आहे. त्याबरोबरच निष्कारण प्रवास टाळण्याबाबत देखील सांगितले आहे. या ठिकाणी भारतीय नागरिकांना देखील गंभीर धोका असल्याचे भारतीय वकिलातीकडून सांगण्यात आले आहे.
भारताने अफगाणिस्तानातील शांततेसाठी मोठे प्रयत्न केले आहेत. त्यासाठी अफगाणिस्तानात तीन बिलीयन अमेरिकन डॉलरची गुंतवणुक भारताने केली आहे. अफगाणी नेतृत्वात अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी भारताने अफगाणिस्तानला सहकार्य केले आहे. मार्च महिन्यात अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद हनिफ अत्मर यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी जयशंकर यांनी त्यांना अफगाणिस्तानातील शांततेसाठी भारताच्या सहकार्याचे आश्वासन दिले होते.