सन २०२८मध्ये होणारी संयुक्त राष्ट्रांची हवामानविषयक परिषद भारतामध्ये घेण्याचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ठेवला. त्यामुळे सन २०२४मध्ये पुन्हा तेच पंतप्रधान होतील, असा आत्मविश्वासही त्यांनी यातून व्यक्त केला आहे. दुबई येथे सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत ते बोलत होते. त्यांना परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलण्याचा मान मिळाला.
‘नागरिकांच्या सहभागातून वृक्षारोपण करून, वातावरणातील कार्बन शोषणारी केंद्रे तयार करणाऱ्या ग्रीन क्रेडिट उपक्रमाची घोषणा मोदी यांनी यावेळी केली. विविध देशांचे प्रमुख आणि शिष्टमंडळ यावेळी उपस्थित होते.
‘मला आशा आहे की, तुम्ही या उपक्रमात सहभागी व्हाल, गेल्या शतकात झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी आपल्याकडे आता वेळ राहिलेला नाही. एक छोटा समूह निसर्गाचे अपरिमित नुकसान करतो. परंतु संपूर्ण मानवतेला त्याची किंमत चुकवावी लागते, विशेषतः जागतिक दक्षिणेकडील देशांमधील नागरिकांना त्याचा त्रास भोगावा लागतो,’ असे पंतप्रधान म्हणाले. सन २०३०पर्यंत उत्सर्जनाची तीव्रता ४५ टक्क्यांनी कमी करण्याचे भारताचे उद्दिष्ट असल्याचे आणि गैर-जीवाश्म इंधनाचा वाटा ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
हे ही वाचा:
अबब! मोबाईल नाहीतर अख्खा मोबाईल टॉवरच गेला चोरीला!
बेंगळुरूमधील १५ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी!
इस्रायलकडून हमासवर पुन्हा हल्ले सुरू!
नक्षलवाद्यांचे ‘हमास’ला समर्थन; महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवर लावले फलक
श्रीमंत देशांनी २०५०पूर्वीच हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी केले पाहिजे, विकसनशील आणि गरीब राष्ट्रांना हवामान बदलाचा सामना करण्यासाठी भरीव आर्थिक मदत तंत्रज्ञान पुरवावे, असे आवाहनही मोदी यांनी केले. ‘सर्वांनी पर्यावरणस्नेही जीवनशैली स्वीकारायला हवी. आपल्या पृथ्वीला पोषक असणाऱ्या जीवनपद्धती सर्व देशांनी स्वीकाराव्यात आणि उपभोगवादी जीवनशैली सोडून द्यायला हवी,’ असे आवाहनही त्यांनी केले.