हरदीपसिंह निज्जर याच्यासह खलिस्तानी दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एप्रिलमध्ये उत्तर अमेरिकेतील भारतीय दुतावासांना ‘गुप्त मेमो’ पाठवल्याचे वृत्त भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावले आहे.
हे वृत्त खोटे आणि बनावट असल्याचा दावा परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी केला. तसेच, पाकिस्तानी गुप्तचरांकडून खोट्या बाबींचा प्रचार केला जात असल्याबद्दल प्रसारमाध्यमांवर टीका केली. हे वृत्त म्हणजे भारताविरुद्ध सतत चुकीची माहिती पसरवण्याच्या मोहिमेचा एक भाग आहे, असा आरोपही त्यांनी केला.
‘आम्ही ठामपणे सांगतो की, हे वृत्त पूर्णपणे खोटे आणि बनावट आहेत. असा कोणताही मेमो देण्यात आलेला नाही. हा भारताविरुद्ध सतत चुकीची माहिती पसरवण्याच्या मोहिमेचा भाग आहे. पाकिस्तानी गुप्तचरांकडून खोट्या कथनांचा प्रचार केला जात आहे, ज्या व्यक्ती अशा बनावट बातम्या पसरवतात, त्या केवळ त्यांच्या स्वत:च्या विश्वासार्हतेच्या किंमती कमी करतात,’ असे त्यांनी सांगितले.
अमेरिकास्थित प्रकाशन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कॅनडाच्या सरे येथे खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची हत्या होण्याच्या दोन महिने आधी म्हणजेच एप्रिलमध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर अमेरिकेतील दूतावासांना निज्जर याच्यावर ‘ठोस उपाय’ करण्याची सूचना देणारा गुप्त मेमो पाठवला होता. या कथित मेमोमध्ये भारताच्या गुप्तचर संस्थेकडून चौकशी सुरू असणाऱ्या अनेक खलिस्तानी दहशतवाद्यांची यादी होती.
निज्जरच्या हत्येनंतरच सप्टेंबरमध्ये भारत आणि कॅनडा यांच्यात राजनैतिक वादाला सुरुवात झाली. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येशी ‘भारतीय सरकारी एजंट्स’चा सहभाग असल्याचा आरोप केला. मात्र भारताने कॅनडाचे हे दावे फेटाळले आणि ट्रूडो सरकारला आरोप सिद्ध करणारे पुरावे सादर करण्याचे आवाहन केले.
हे ही वाचा:
साडेतीनशे कोटींचं घबाड सापडण्यापूर्वी काँग्रेस खासदार साहू काळ्या पैशाने होते व्यथित
महाराष्ट्रात ISIS विरोधात NIA ची कारवाई, साकीब नाचनला अटक
अमेरिकेत भारतवंशी जाणून घेणार राम मंदिराचा संघर्ष
सन २०२०मध्ये निज्जर याला भारताने दहशतवादी म्हणून घोषित केले होते. तो प्रतिबंधित खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख होता. कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे येथे दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गुरुद्वाराबाहेर त्याची गोळ्या झाडून हत्या केली होती.