भारतीय सेनादल आणि चिनी लष्कर यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष उडाला असून ९ डिसेंबरला ही घटना घडली आहे. अरुणाचल प्रदेशच्या तवांग भागात ही घटना घडली. भारतीय सेनादलाने अधिकृत पत्रक काढून ही माहिती दिली.
दोन्ही दलांमध्ये उडालेल्या या संघर्षामुळे काही जवान जखमी झाले आहेत. पण त्यात कुणाचा मृत्यू झाल्याची मात्र खबर नाही. चिनी सेनादलातील ३०० सैनिक पूर्ण तयारीनिशी भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते, पण भारतीय सैन्यही जय्यत तयारीत होते. न्यूज १८ ला मिळालेल्या माहितीनुसार चिनी पीपल्स ऑफ लिबरेशन आर्मीने तवांग येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ घुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा भारतीय सैन्याने त्यांना चोख उत्तर दिले. त्यामुळे तिथे काही काळ तणाव होता.
सूत्रांच्या माहितीनुसार न्यूज १८ने म्हटले की, तवांग भागात दोन्हीकडील सैन्य गस्त घालत असते. ती जागा आपलीच असल्याचा दोन्ही सैन्यदलांचा दावा आहे. ही परिस्थिती २००६पासून अशीच आहे. या संघर्षामुळे दोन्हीकडील सैनिकांना जखमा झाल्या आहेत. या संघर्षानंतर पुन्हा दोन्हीकडील सैन्य एकमेकांपासून दूर गेले पण चिनी सैनिक या संघर्षात अधिक संख्येने जखमी झाल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा:
मुंबईतील जी-२० ची जय्यत तयारी; काही नव्या नियमांची करावी लागणार अंमलबजावणी
‘निर्भया फंडातून मिळालेल्या गाड्या सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, वडेट्टीवार यांनी वापरल्या’
जी २० च्या पहिल्या विकास कार्यगटाची होणार मुंबईत बैठक
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या पाठीशी रशिया
या घटनेमुळे पुन्हा एकदा गलवान खोऱ्यातील संघर्षाची आठवण ताजी झाली आहे. त्यावेळी भारत आणि चीनच्या सेनेत असाच खटका उडाला होता. १५ जून २०२०ला हा संघर्ष झाला होता. त्यात भारताचे २० जवान मारले गेले होते तर चीनच्या ४३ जवानांना प्राण गमवावे लागले. अर्थात अधिकृतपणे चीनने ५ जवानांबाबत माहिती दिली. त्यावेळी पंतप्रधान आणि तत्कालिन तिन्ही दलांचे संरक्षण दल प्रमुख दिवंगत जनरल बिपिन रावत या जवानांना भेटण्यासाठी गेले होते.