‘पाकिस्तानने चिथावणी दिली तर त्यांचे काही खरे नाही…भारत देणार चोख उत्तर

अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात हा दावा करण्यात आला आहे.

‘पाकिस्तानने चिथावणी दिली तर त्यांचे काही खरे नाही…भारत देणार चोख उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत पूर्वीच्या तुलनेत पाकिस्तानच्या चिथावणीला लष्करी बळाने उत्तर देऊ शकतो असा विश्वास अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या वार्षिक धोक्याच्या संदर्भातील एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संकट अत्यंत गंभीर असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत पाकिस्तानच्या कथित चिथावणीला लष्करी ताकदीने प्रत्युत्तर देऊ शकतो, असे या अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, भारत आणि पाकिस्तान अण्वस्त्रधारी आहेत आणि हेच या दोन देशांमधील सर्वात मोठे संकट आहे. परंतु २०२१ च्या सुरुवातीला नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूंमधील नवीन युद्धविरामानंतर नवी दिल्ली आणि इस्लामाबाद त्यांच्या संबंधांमध्ये शांतता मजबूत करण्यास उत्सुक असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

अमेरिकेच्या गुप्तचर समुदायाकडून दरवर्षी हा अहवाल प्रसिद्ध होतो. ताज्या अहवालामध्ये भारताला असलेल्या धोक्यांचेही मूल्यमापन करण्यात आले आहे. राष्ट्रीय गुप्तचर संचालनालय कार्यालयाकडून हा अहवाल अमेरिका काँग्रेसला सादर केला जातो . भारत-चीन द्विपक्षीय सीमा विवाद संवादाद्वारे सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु २०२० मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमधील संघर्ष पाहता हे संबंध तणावपूर्ण राहतील. दोन्ही देशांमधील संबंध गंभीर पातळीवर गेले असल्याचे अहवालात म्हटले आहे.

हे ही वाचा:

महिला दिनाच्या निमित्ताने अनोखा माहेरवाशिणी महिला दिवस

राऊतांची तर रोजच होळी, तीच बोंब तीच भांग

विधी मंडळ आहे ते, राणीची बाग नाही…

इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ

अहवालात पुढे म्हटले आहे की, भारतविरोधी दहशतवादी गटांना पाठिंबा देण्याचा पाकिस्तानचा मोठा इतिहास आहे. पाकिस्तानने भारताला कोणत्याही प्रकारे चिथावणी दिली, तर त्याचे उत्तर भारत आगामी काळात देऊ शकतो. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला जगभरातील धोक्यांच्या संदर्भात प्रकाशित केलेला हा वार्षिक अहवाल इंटेलिजन्स कम्युनिटीच्या सामूहिक दृष्टिकोनाचे द्योतक आहे.

भौगोलिक क्षेत्रात देशांच्या वाढत्या लष्करी कारवायांमुळे आंतरराज्य संघर्षाची शक्यता वाढते असाही सूर या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. युक्रेन आणि रशिया दरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे कोरोना महामारी आणि गरिबीत वाढ झाली आहे. त्यामुळे आर्थिक विकासाला धक्का बसला आहे आणि असमानता वाढली आहे याकडेही अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.

Exit mobile version