चीनमध्ये शुक्रवार ४ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटन आणि समारोपाच्या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा भारताने केली़ आहे. त्यामुळे आता भारत आणि चीन यांच्यात संघर्षाची नवी ठिणगी पडली आहे. हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात रिलेदरम्यान भारतासोबतच्या गलवान संघर्षात जखमी झालेल्या चिनी कमांडरलाच मशालवाहक म्हणून जबाबदारी सोपवल्यानंतर भारताने हा निर्णय जाहीर केला आहे.
ऑलिम्पिकसाठी बुधवारी मशाल फेरी काढण्यात आली, त्यामध्ये १ हजार २०० मशालधारक सहभागी झाले होते. या सोहळ्यामध्ये फाबाओ हा अधिकारीही सहभागी झाला होता. फाबाओ हा चीनच्या लष्करात वरिष्ठ अधिकारी असून १५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षावेळी तो उपस्थित होता. या संघर्षामध्ये त्याच्या डोक्यालाही जखम झाली होती. मशालवाहक म्हणून फाबाओच्या हाती मशाल सोपविण्याचा निर्णयाचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
‘ऑलिम्पिक स्पर्धेचे राजकीयीकरण करण्याचा चीनचा निर्णय दुर्दैवी आहे. त्याचा निषेध म्हणून भारतीय राजनैतिक शिष्टमंडळ ऑलिम्पिक स्पर्धांच्या उद्घाटन किंवा समारोपाच्या समारोपाला उपस्थित राहणार नाही,’ अशी माहिती परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
पुण्यात मॉलचा स्लॅब कोसळून पाच कामगारांचा मृत्यू
माघी गणेशोत्सव का साजरा केला जातो?
बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात
दक्षिण आशियातील सर्वाधिक रामसार क्षेत्र भारतात
परराष्ट्र विभागाने भारतीय शिष्टमंडळ ऑलिम्पिकसाठी पाठवण्यास नकार दिलेला असताना दूरदर्शननेदेखील ऑलिम्पिकचा उद्घाटन आणि समारोपाचा सोहळा लाइव्ह प्रक्षेपित करणार नसल्याचे जाहीर केले आहे.