भारताने आपल्या मजार ए शरीफ येथील दुतावातासून अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांना परत बोलावले आहे. अफगाणिस्तानातील ढासळत्या सुरक्षेच्या कारणास्तव भारताने हे पाऊल उचलले आहे. अफगाणिस्तानातील अनेक भागांमध्ये तालिबानचे वर्चस्व वाढत आहे, त्यामुळे तेथील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
अमेरिका अफगाणिस्तानमधून वेगाने बाहेर पडण्याची तयारी करत आहे. अफगाणिस्तानचे सैनिक आणि तालिबान यांच्यात संघर्ष सुरू आहे. तालिबानला पाकिस्तानकडून मदत मिळत असल्याचे आरोप अफगाणिस्तान सरकारने केले आहेत. या अशा वातावरणात भारत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष झाला आहे. सुरक्षा परिषदेची १८ आणि १९ ऑगस्ट रोजी बैठक आहे. या बैठकीत अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर चर्चा होणार आहे. सुरक्षा परिषदेच्या बैठकीआधी अमेरिकेत महत्त्वाच्या चर्चा आणि बैठकांसाठी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर रवाना होत आहेत. यामुळेच अफगाणिस्तानमध्ये शांती सेना पाठवली जाणार असल्याची चर्चा जोर धरत आहे.
अफगाणिस्तानातील वाढत्या अस्थिरतेबाबत भारतातील अफगाणिस्तानचे राजदुत फरिद मामुंदझे यांनी परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रींगला यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी अफगाणिस्तानातील परिस्थितीबाबत श्रींगला यांना सविस्तर माहिती दिली होती.
हे ही वाचा:
मंदिर बंद ठेवून बार सुरू करणं हे ठाकरे सरकारचं धोरण
मंत्रालयात दारूच्या बाटल्या ही काळीमा फासणारी घटना
आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो?
या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानातील भारतीय दुतावासाने सुरक्षेच्या सुचना जारी केल्या आहेत. त्यांनी अफगाणिस्तानात असलेल्या किंवा येणाऱ्या लोकांना काळजी घेण्याची सुचना दिली आहे. त्याबरोबरच निष्कारण प्रवास टाळण्याबाबत देखील सांगितले आहे. या ठिकाणी भारतीय नागरिकांना देखील गंभीर धोका असल्याचे भारतीय वकिलातीकडून सांगण्यात आले आहे.