शेवट गोड

शेवट गोड

विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघाचे आयसीसी पुरुष टी२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. सुपर बारा फेरीतून भारतीय संघाला आता घरचा रस्ता धरावा लागणार आहे. पण टीम इंडियाच्या या वर्ल्डकप वारीचा शेवट मात्र गोड झाला आहे. नामिबिया या दुबळ्या संघावर भारतीय क्रिकेट संघाने ९ विकेट्सनी विजय मिळवला आहे.

नाणेफेक जिंकत भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अपेक्षे प्रमाणे भारतीय गोलंदाजांनी नामिबियाच्या फलंदाजांना स्वस्तात रोखले. अष्टपैलू गोलंदाज रविंद्र जडेजा याने नामिबियाच्या फलंदाजांची चांगलीच फिरकी घेतली. चार षटकांमध्ये त्याने तीन फलंदाजांना माघारी धाडले. तर रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनीदेखील प्रत्येकी तीन आणि दोन फलंदाज बाद केले. भारतीय गोलंदाजांच्या या कामगिरीच्या जोरावर भारताने नामिबियाला २० षटकांमध्ये १३२ धावांवर रोखले

हे ही वाचा:

नवाबशास्त्री प्रभूणे

नवाब मलिकांना न्यायालयाने झापले; ट्विटरवर उत्तरे देता, इथेही द्या!

‘एसटीला भगवा दिला, पण कर्मचारी नागवा झाला’

हिंदू पलायन झालेल्या कैरानामध्ये योगी

१३३ धावांचे विजयी लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने अवघ्या १५.२ षटकांमध्ये १३६ धावा करत नामिबियाचा धुव्वा उडवला. सलामीला आलेल्या रोहित शर्मा (५६) आणि के. एल. राहुल (५४*) या दोघांनीही आपली अर्धशतके साजरी केली. तर सूर्यकुमार यादवने नाबाद २५ धावा करत त्यांना चांगली साथ दिली. रोहित शर्माच्या रुपाने भारतीय संघाने आपला एक फलंदाज गमावला. पण त्यानंतर भारतीय संघाचा इतर कोणताच फलंदाज बाद झाला नाही.

नामिबिया विरुद्धचा हा सामना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा प्रशिक्षक म्हणून अखेरचा सामना होता. तर टी२० प्रकारातील कर्णधार विराट कोहलीचाही हा अखेरचा सामना होता. त्यामुळे या विजयासह शेवट गोड झाला असेच म्हणावे लागेल.

Exit mobile version