भारत आणि फिजी या दोन देशांनी कृषी आणि संलग्न क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी सामंजस्य करार केला आहे. मंगळवार, २२ जून रोजी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. भारताचे केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि फिजी देशाचे कृषी, जलमार्ग आणि पर्यावरण मंत्री डॉ.महेंद्र रेड्डी यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यावेळी बोलताना भारताचे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ‘हा सामंजस्य करार दोन्ही देशांमधील बहुआयामी सहकार्य आणि संबंध अधिक दृढ करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल’ असे मत व्यक्त केले.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि फिजीचे कृषी, जलमार्ग व पर्यावरण मंत्री डॉ.महेंद्र रेड्डी यांच्यात मंगळवार, २२ जून रोजी आभासी स्वरूपाची बैठक पार पडली. या बैठकीत भारत आणि फिजी यांच्यात कृषी आणि संलग्न क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करारावर दोन्ही मंत्र्यांनी स्वाक्षरी केली.
हे ही वाचा:
मोदी सरकारकडून हिंगोली जिल्ह्याला ७० कोटी
ज्या दिवशी हे सरकार पडेल, त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ
उद्धव ठाकरे नाना पटोलेंवर नाराज?
उत्तरप्रदेशात जबरदस्तीने धर्मांतरण करणाऱ्यावर रासुका
यावेळी बोलताना भारताचे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ‘वसुधैव कुटूंबकम्’ चा विचार बोलून दाखवला. ‘वसुधैव कुटूंबकम्’ या भावनेवर भारताचा विश्वास आहे. तर कोरोना महामारीच्या काळातही भारताने सर्व देशांना समान भावनेने मदत केली याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तर फिजीचे मंत्री डॉ.रेड्डी यांनी या नव्या सामंजस्य कराराबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की दोन्ही देश एकमेकांमधील परस्पर संबंध याच समान भावनेने कायम ठेवतील.
या नव्या सामंजस्य करारात दुग्ध उद्योग विकास, तांदूळ उद्योग विकास, कंदमुळाचे वैविध्यकरण, जलसंपदा व्यवस्थापन, नारळ उद्योग विकास, अन्न प्रक्रिया उद्योग विकास, कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन उद्योग विकास, कृषी संशोधन, पशुसंवर्धन, कीड आणि रोग, लागवड, मूल्यवर्धन आणि विपणन, कापणी आणि दळणे, कृषी विज्ञान या क्षेत्रांमध्ये सहकार्याची तरतूद करण्यात आली आहे.