भारताने २० ऑक्टोबर रोजी मॉस्को येथे होणाऱ्या अफगाणिस्तान चर्चेत सामील होण्यासाठी रशियाचे आमंत्रण स्वीकारले आहे. दोन महिन्यांपूर्वी सत्ता काबीज केलेल्या तालिबानलाही चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. यामुळे ते पहिल्यांदाच भारतासमोर अधिकृतरित्या आमनेसामने येतील. तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर त्यांनी अफगाणिस्तानच्या राजनैतिक कर्मचाऱ्यांना देशातून बाहेर काढले होते.
“आम्हाला २० ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानवरील मॉस्को फॉरमॅट बैठकीचे आमंत्रण मिळाले आहे. आम्ही त्यात सहभागी होणार आहोत.” असे भारतीय सहभागाची पुष्टी करताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी सांगितले.
अशी शक्यता आहे की परराष्ट्र मंत्रालय एक संयुक्त सचिव-स्तरीय अधिकारी बैठकीला पाठवेल, याबाबतचा अंतिम निर्णय होणे बाकी आहे. गेल्या आठवड्यात, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे अफगाणिस्तानमधील विशेष प्रतिनिधी जमीर काबुलोव यांनी सांगितले की, “मॉस्कोने २० ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानवर तालिबानच्या प्रतिनिधींना आंतरराष्ट्रीय चर्चेसाठी आमंत्रित केले आहे.” अफगाणिस्तानवरील जी-२० शिखर परिषद १२ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती.
कतारमधील भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी ऑगस्टच्या अखेरीस दोहामध्ये तालिबानच्या प्रतिनिधींची भेट घेतली होती. आता मॉस्कोमधील ही बैठक भारतीयांसाठी दुसरी असेल.
ऑगस्टमध्ये काबूलच्या पाडावानंतर, भारताने तालिबानच्या नवीन राजवटीत सर्वसमावेशकतेचा अभाव, अल्पसंख्यांक, महिला आणि मुलांचे हक्क यावर प्रश्न उपस्थित केले आणि अफगाणिस्तानातून उद्भवलेल्या दहशतवादावर चिंता व्यक्त केली होती.
हे ही वाचा:
राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा!
काश्मीरमध्ये चकमक सुरूच; एका अधिकाऱ्याला आणि जवानाला वीरमरण
सरसंघचालकांनी केले अखंड भारताचे सूतोवाच
भारत लसीकरणाच्या नव्या शिखराकडे!
या वर्षी मार्चमध्ये, मॉस्कोने अफगाणिस्तानवर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते ज्यात रशिया, अमेरिका, चीन आणि पाकिस्तान यांनी संयुक्त निवेदन जारी केले होते.