पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होत असून त्यांच्यावर आणखी सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच इम्रान खान यांना पाकिस्तानी रेंजर्संनी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक केली होती. सध्या इम्रान खान हे जामीनावर बाहेर असून लष्कराच्या मुख्यालयावरील हल्ला प्रकरणात इम्रान खान यांच्यावर आणखी सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
इम्रान खान यांना पाकिस्तानी रेंजर्संनी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक केल्यानंतर संपूर्ण पाकिस्तानमध्ये त्यांच्या समर्थकांनी हिंसक आंदोलने केली होती. यावेळी इम्रान खान यांच्या समर्थकांनी लष्कराच्या मुख्यालयावरही हल्ला केला होता. सध्या इम्रान खान जामिनावर बाहेर आहेत. मात्र, लष्कराच्या मुख्यालयावरील हल्ला प्रकरणात इम्रान खान यांच्यावर आणखी सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी तीन खटले कठोर दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आले आहेत.
इम्रान यांच्याविरोधात ९ मे रोजीच्या हिंसेप्रकरणी तीन आणि १० मे रोजीच्या हिंसेप्रकरणी अन्य तीन खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यांना ९ मे रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक केल्यानंतर त्यांच्या पाकिस्तान तेहेरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या समर्थकांनी देशभर हिंसक निदर्शने केली. संतप्त जमावाने २० पेक्षा अधिक नागरी आणि लष्करी ठिकाणांवर हल्ले केले होते . दरम्यान, इम्रान खान समर्थकांनी रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयात घुसून तोडफोड केली होती. याशिवाय निदर्शकांनी लाहोरमध्ये ‘जिना हाऊस’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या कमांडर कॉर्प्स दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचीही जाळपोळ केली होती.
हे ही वाचा:
ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थिनीला जिवंत गाडले
बुलढाणा बस अपघात: चालक मद्यधुंद अवस्थेत होता
मुंबईच्या पूर्व उपनगरातून ८० सराईत गुन्हेगार हद्दपार
महानगरपालिका अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्यांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप
या सर्व प्रकरणांमध्ये तपास पथकांमार्फत संयुक्त तपास केला जात आहे. आतापर्यंत इम्रान खान यांच्याविरोधात १५० पेक्षा जास्त खटले दाखल करण्यात आले आहेत. यातील तीन खटले कठोर दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत.