वाहतूक नियम मोडल्याबद्दल १७ वर्षीय किशोरवयीनाचा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर फ्रान्स हिंसाचाराने धगधगते आहे. सहाव्या दिवशी किशोरवयीन मुलाच्या आजीने हिंसाचार संपवण्याचे आवाहन केल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली आहे. पोलिसांनी आतापर्यंत हिंसाचाराप्रकरणी तीन हजार ३५४ दंगलग्रस्तांना अटक केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी देशभर ४५ हजारांहून अधिक सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
सोमवारी फ्रान्समध्ये स्थानिक लोकांनी टाऊन हॉलच्या समोर उभे राहात सरकारच्या समर्थनार्थ एकजुटीचे प्रदर्शन केले. पोलिसांच्या मते हिंसाचार पूर्णपणे थांबलेला नाही. अद्यापही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत दंगलखोरांनी ३००हून अधिक गाड्या आणि सुमारे ४० इमारतींना आगी लावल्या आहेत. दंगलखोरांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे २५० हून अधिक पोलिस जखमी झाले आहेत. रविवारी रात्री उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी १५० जणांना अटक केली आहे.
तोडफोड, आगी लावणे तसेच, पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी तीन हजारांहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील बहुतांश नागरिक मुस्लिम आहेत, असे फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डरमनिन यांनी सांगितले. याआधी राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी हिंसाचाराला प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडियाला जबाबदार ठरवले होते. तर, फ्रान्सचे विधी मंत्री यांनी सोशल मीडियावर हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, असा इशारा दिला होता. देशभरातील नेत्यांच्या भेटी फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी सोमवारी दोन्ही सदनांतील नेत्यांच्या भेटी घेतल्या. तसेच, ते मंगळवारी फ्रान्सच्या २२० शहरांच्या महापौरांचीही भेट घेणार आहेत.
हे ही वाचा:
मागाठाणे ते देवीपाडा मेट्रोचा वेग मंदावला
सोलापूर जिल्हा ‘धार्मिक पर्यटन क्षेत्र’ म्हणून घोषित करणार, मंगलप्रभात लोढा!
अजित पवारांच्या येण्यामुळे महायुतीला अधिक ताकद मिळेल!
खासदार अमोल कोल्हेंचा यु टर्न; शरद पवारांसोबत असल्याचे ट्वीट
‘लुटालुटीमुळे न्याय मिळणार नाही’
पोलिसकारवाईत मारल्या गेलेल्या किशोरवयीन मुलाच्या आजीने, नाहेलला न्याय मिळण्याच्या मागणीच्या आडून दंगल करणे थांबवण्याचे आवाहन केले. स्कूल, बस आणि इमारतींना आग लावून न्याय मिळणार नाही. या शाळांमध्ये नाहेलसारखी कित्येक मुले आहेत. बसमधून कितीतरी माता प्रवास करतात, ज्यांची नाहेलसारखी मुले आहेत. बँका, घरे आणि दुकानांना लुटल्याने नाहेलला न्याय मिळेल, असे आम्ही कधीच म्हटले नव्हते. आम्ही सर्व पोलिसांवर नाराज नसून केवळ त्याच पोलिसावर नाराज आहोत, ज्याने नाहेलला गोळी मारली,’ अशी प्रतिक्रिया या आजीने दिली आहे.