आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून भारताचा शेजारी असलेल्या बांगलादेशात आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण मिळालं आणि शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांनी देश सोडून पलायन केलं आणि भारतात आश्रय घेतला. बांगलादेशातील सध्याची परिस्थिती भयावह असून सर्वत्र जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडत आहेत. आंदोलकांनी जाळपोळ करत असतानाच कारागृहात प्रवेश करत तुरुंग पेटवून दिला. दरम्यान, सुमारे ५०० कैदी पळून गेले आहेत. विशेष म्हणजे या कैद्यांमध्ये अनेक दहशतवाद्यांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.
बांगलादेशमधील परिस्थिती हिंसक बनत असून देशात सत्तापालट होताच व्यवस्था कोलमडली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बांगलादेशात रविवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून कर्फ्यू लागू करण्यात आला होता. मात्र, सोमवारी हिंसक आंदोलकांनी कर्फ्यु झुगारुन शेख हसीना यांच्या घराला घेराव घातला. तसेच कर्फ्यु दरम्यानच शेरपूर कारागृहात हल्लेखोर लाठ्या घेऊन घुसले आणि त्यांनी सुमारे ५०० कैद्यांना कारागृहातून बाहेर काढलं. यात काही दहशतवाद्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. याचं पार्श्वभूमीवर भारताच्या सीमा भागात अलर्ट देण्यात आला आहे.
हे ही वाचा..
न्यूयॉर्कमधील बांगलादेशच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला
‘बांगलादेशातील परिस्थिती इतकी भीषण नाही की, भारतीयांना बाहेर काढण्याची गरज आहे’
‘बांगलादेशातील परिस्थिती इतकी भीषण नाही की, भारतीयांना बाहेर काढण्याची गरज आहे’
बांगलादेशमधील हिंसाचारामागे आयएसआय पुरस्कृत इस्लामी छात्र शिबीर संघटना?
सध्या शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत, देशाबाहेर पलायन केलं. त्यांनी भारतात आश्रय घेतला असून त्या काही दिवसांत इंग्लंडला जाणार असल्याची माहिती आहे. १९७१ मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धात लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबांसाठी ३० टक्के सरकारी नोकऱ्या आरक्षित करण्याच्या मागणीसह गेल्या महिन्यात सुरू झालेल्या आंदोलनाचे नंतर सरकारविरोधी निदर्शनांमध्ये रूपांतर झाले. लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर देशभरातील उत्साही जनसमुदाय त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरला. पुढे याला हिंसक वळण मिळाले.