पाकिस्तानमधून एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाकिस्तानच्या अशांत अशा बलुचिस्तान प्रांतात शनिवारी पहाटे बंदूकधाऱ्यांनी एका बसमधून नऊ जणांचे अपहरण करत त्यांची हत्या केली. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.
पोलिस अधिकारी अब्दुल्ला मेंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बलुचिस्तानमधील नोश्की जिल्ह्यात बंदूकधाऱ्यांनी इराणला जाणारी बस अडवली. त्यानंतर त्यांनी बसमधील प्रवाशांचे ओळखपत्र तपासात बसमधील नऊ जणांना उतरवले आणि त्यांचे अपहरण केले. हे नऊ जण पंजाबच्या पूर्व प्रांतातील असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर काही वेळाने या नऊ जणांचे मृतदेह सापडले असून त्यांना अगदी जवळून गोळ्या घालण्यात आल्याची माहिती आहे.
उपायुक्त हबीबुल्ला मुसाखेल यांनी सांगितले की, नोश्कीजवळील सुलतान चरहाईच्या आसपास सुमारे १० ते १२ बंदूकधाऱ्यांनी क्वेटा-तफ्तान महामार्ग एन-४० ब्लॉक केला. यानंतर तेथून जाणाऱ्या बसमधून नऊ प्रवाशांचे अपहरण करण्यात आले. बंदूकधाऱ्यांनी तफ्तानला जाणाऱ्या बसमधील प्रवाशांची ओळखपत्रे तपासली. यानंतर त्याचे अपहरण करून नंतर हत्या करण्यात आली. अपहरण केलेल्या प्रवाशांचे मृतदेह जवळच्या पुलाखाली सापडले आहेत. त्यांची लूट झाली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या हत्येची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने किवां प्रतिबंधित संघटनेने स्वीकारलेली नसली तरी, या वर्षी अलीकडच्या काही दिवसांत या प्रांतात बंदी घातलेल्या संघटना आणि दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. या हल्ल्यांमध्ये सुरक्षा दल आणि आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने या प्रांतात ग्वादर बंदर, तुर्बतमधील नौदल तळ अशा काही ठिकाणी मोठे दहशतवादी हल्ले केल्याचा दावा केला आहे.
हे ही वाचा:
महायुतीच्या संकल्प मेळाव्यास कांदिवली पूर्वमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात गोळीबार; चार जण ठार
बंगळूरू कॅफे ब्लास्टमागील आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी
“निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असला तरी नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर पूर्ण झाले नसते”
बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर सरफराज बुगती म्हणाले की, नोश्की हायवेवर लोकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना कदापि माफ केले जाणार नाही आणि त्यांना लवकरच पकडले जाईल. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जाईल. बलुचिस्तानची शांतता बिघडवणे हा त्यांचा उद्देश आहे.