तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवार, १९ एप्रिल रोजी पुन्हा एकदा पत्नीच्या आरोग्यबद्दल विधान करत गंभीर आरोप केला आहे. इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांना टॉयलेट क्लिनर मिसळलेले जेवण देण्यात आले असून विषयुक्त अन्न खाल्ल्यानंतर ती दररोज पोटाच्या आजाराने त्रस्त असून तिची प्रकृती खालावली असल्याचा दावाही इम्रान खान यांनी केला आहे.
इम्रान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना भ्रष्टाचार प्रकरण आणि इम्रान खान यांच्यासोबतच्या बेकायदेशीर लग्न प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. सध्या त्यांना इस्लामाबादच्या उपनगरातील त्यांच्या बनी गाला या निवास्थानी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) प्रमुख इम्रान खान यांनी रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगातील भ्रष्टाचाराच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान हे आरोप केले आहेत.
इम्रान खान म्हणाले की, शौकत खानम रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ असीम युसूफ यांनी इस्लामाबादमधील शिफा आंतरराष्ट्रीय रुग्णालयात बुशरा बीबीच्या चाचण्या घेण्याची शिफारस केली होती. त्यांनी आरोप केला की तुरुंग अधिकारी पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पीआयएमएस) रुग्णालयात चाचण्या घेण्यावर ठाम आहेत. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी इम्रान खान यांना कोठडीत असताना पत्रकार परिषद घेणे टाळण्यास सांगितले. अनेक खटल्यांमध्ये दोषी ठरलेल्या इम्रान खानने सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांशी १० मिनिटे संवाद साधण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली.
हे ही वाचा:
“संजय राऊतांनी वादग्रस्त बोलताना स्वतःच्या मुलीकडे, आईकडे आणि पत्नीकडे बघायला हवे होते”
‘माझ्या मुलीची हत्या ‘लव्ह जिहाद’मुळे’
मोदीस्तुती करणारे गाणे गाणाऱ्या युट्युबरवर मुस्लिम तरुणांचा हल्ला
मुंबईचा पैसा, लखनौची जमीन, ठाकरेंच्या नावाने गलका…
इम्रान खान यांनी १७ एप्रिल रोजी बुशरा बीबीच्या तुरुंगवासासाठी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर थेट जबाबदार असल्याचा आरोप केला होता. तसेच पत्नीला काही झाल्यास जबाबदार असाल असा इशाराही दिला होता. माझ्या पत्नीला काहीही झाले तरी मी असीम मुनीरला सोडणार नाही, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी असीम मुनीरला सोडणार नाही. मी त्याच्या असंवैधानिक आणि बेकायदेशीर कृत्यांचा पर्दाफाश करेन, असंही इम्रान खान म्हणाले होते.