डेपसान्ग, हॉट स्प्रिंग्स भागातील ‘डिसएंगेजमेंट’ कडे सर्वांचे लक्ष

डेपसान्ग, हॉट स्प्रिंग्स भागातील ‘डिसएंगेजमेंट’ कडे सर्वांचे लक्ष

पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पेगाँग लेकपासून उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावर ‘डिसएंगेजमेंट’ प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज भारत आणि चीन दरम्यान महत्त्वाची चर्चा होणार आहे. दोन्ही देशादरम्यान आजवर नऊ वेळा चर्चा झाल्या आहेत. आता दहाव्यांदा दोन्ही देशांच्या सैन्यातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे. या बैठकीत डेपसांग, हॉट स्प्रिंग आणि गोगरामधील सैन्य वापसीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही देशांकडून पेगाँगमधून सैन्य माघारी घेण्याच्या प्रक्रियेची समीक्षाही करण्यात येणार आहेत.

हे ही वाचा:

गलवान मध्ये चीनचे ४ सैनिक मारले गेले, चीनची कबुली

भारत आणि चीन दरम्यानची ही बैठक चीनजवळील मॉल्डो सीमेवर होणार आहे. भारताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन करतील. मेनन हे लेह येथील चौदाव्या कोअरचे कमांडर आहेत. तर चीनी सैन्याच्या दक्षिणी शिनजियांग सैन्याचे कमांडर मेजर जनरल लिउ लिन हे चीनी शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. पेगाँग खोऱ्यातील उत्तर आणि दक्षिणेकडील किनाऱ्यावरून सैनिकांची माघार, शस्त्र आणि इतर सामान, बंकर, तंबू आणि तात्पूरते बांधकाम हटवण्याचे काम गुरुवारीच पूर्ण झाल्याचे चीनकडून सांगण्यात आले आहे. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींकडून याची पाहणीही केली गेली आहे.

काय आहे करार?

भारत आणि चीन सैन्य कमांडर कराराच्या नुसार, दोन्ही पक्ष पहिल्यासारखीच परिस्थिती कायम ठेवणार आहे. मे २०२० मध्ये वाद सुरू होण्यापूर्वी जशी परिस्थिती होती, तशीच परिस्थिती कायम ठेवण्याचा यावेळी निर्णय झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही याबाबत भाष्य केले होते. या करारानुसार चीन त्यांची सैन्य तुकडी पेगाँग नॉर्थमध्ये फिंगर-8 च्या पलीकडे पूर्व दिशेला ठेवेल. तर भारतही आपली सैन्य तुकडी फिंगर-3 च्या जवळ कायमस्वरुपी धनसिहं राणा पोस्टजवळ ठेवेल. अशा प्रकारे साऊथ बँक परिसरात दोन्ही पक्षांकडून ‘डिसएंगजमेंट’ करण्यात येईल. तसेच नॉर्थ बँकवर सुरू असलेली परंपरागत पेट्रोलिंग तात्पुरती स्थगित करण्यात येणार आहे. दोन्ही पक्षांमधील चर्चा पुढे गेल्यानंतर पेट्रोलिंग सुरू करण्यात येईल, असेही या करारानुसार ठरले आहे.

Exit mobile version