जन्म तारखेची वैधता निश्चित करण्यासंबंधी महत्त्वाचा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. आधारकार्ड व पॅनकार्डवरील जन्मतारखेवरून वय ठरवता येणार नाही.
आधारकार्ड आणि पॅनकार्ड हे जन्मतारखेचे वैध पुरावे नाहीत. वय निश्चित करण्यासाठी शाळेच्या दाखल्यावरील जन्मतारीख ग्राह्य धरली जाऊ शकते, असा महत्त्वाचा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला. शाळेच्या दाखल्यावरील तारखेवर आक्षेप असेल तर स्थानिक पंचायतीचा दाखला मान्य केला जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
मेरठमधील एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निकाल दिला. लग्न केलेल्या तरुणीच्या घरच्यांनी मुलाकडील कुटुंबाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण न्यायालयात दाखल झाल्यानंतर मुलीच्या वयाचा मुद्दा उपस्थित झाला. आधारकार्ड व पॅनकार्डवरील जन्मतारखेनुसार आम्ही प्रौढ आहोत, त्यामुळे आमच्या लग्नामध्ये हस्तक्षेप करण्यापासून घरच्यांना रोखा, असा दावा याचिका करणाऱ्या तरुणीने केला होता. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाने आधारकार्ड आणि पॅनकार्ड संबंधीचे महत्त्वपूर्ण मत नोंदवले. आधार, पॅनकार्ड आणि वैद्यकीय अहवालातील जन्मतारीख भिन्न असताना शाळेचा दाखला आणि तरुणीच्या आईच्या म्हणण्यावर अविश्वास दाखवू शकत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने तरुणीची याचिका फेटाळली.
हे ही वाचा:
लॉर्ड्स कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर
दोन लसी घेतलेल्यांचे ‘तिकीट कापले’
महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची ट्विटर खाती लॉक
ठाकरे सरकारची गोंधळवृत्ती; शिष्यवृत्ती परीक्षा फक्त मुंबईत रद्द
जन्मतारीख निश्चित करण्यासाठी जर शाळेचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल, तर आधारकार्ड, पॅनकार्ड आणि वैद्यकीय अहवालावर विचार करण्याचा प्रश्न उरत नाही. शाळेच्या दाखल्यावरील जन्मतारखेवर आक्षेप घेतला जात असेल तर स्थानिक पंचायतीचा दाखला मान्य केला जाईल. हा दाखला नसेल तर वैद्यकीय अहवालाला परवानगी दिली जाऊ शकते असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.