रशिया युक्रेन युद्धाचा जगाच्या बाजारपेठेवर परिणाम होत आहे. भारतही याला अपवाद नाही, युद्धामुळे भारतीय बाजार पेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीत तीव्र वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम आयात महागाईवर होण्याची शक्यता आहे. देशाच्या व्यापार आणि चालू खात्यातील तूट वाढण्याचा धोका निर्माण झाल्याने भारतीय रुपयाने आजच्या व्यापारात नीचांक पातळी गाठली आहे. त्याशिवाय सोन्याच्या दारानेही आज उच्चांक गाठला आहे.
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया २३ पैशांनी घसरून ७६.१७ वर बंद झाला, तर ही १५ डिसेंबर २०२१ नंतरची सर्वात कमी बंद पातळी आहे. आज भारतीय रुपयाने सुरुवातीच्या व्यवहारात आजीवन नीचांकी पातळी गाठली आहे. कारण जागतिक कच्च्या तेलाच्या किमती १३० डॉलर च्या वर गेल्याने आयात महागाई वाढण्याची आणि देशाची व्यापार तसेच चालू खात्यातील तूट वाढण्याचा धोका निर्माण झाला. भारत आपल्या तेलाच्या गरजेपैकी दोन तृतीयांश पेक्षा जास्त तेल आयात करतो.
सोन्याच्या भावावरही याचा परिणाम दिसून येत आहे. सोन्याच्या भावाने गेल्या दीड वर्षातील आज सर्वोच्च भाववाढ नोंदवली गेली आहे. त्यामध्ये २४ कॅरेट सोन्याचे दर हे दहा ग्रॅमच्या मागे जीएसटीसह ५५ हजार रुपयांच्या घरात गेला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅमच्या मागे जीएसटीसह ५१ हजार रुपये नोंदवले गेले आहेत. तसेच चांदीच्या दरातही वाढ झालेली आहे. आज चांदीचा दर किलोमागे ७१ हजार रुपये आहे.
हे ही वाचा:
… म्हणून भारतीय महिलांचं होतंय कौतुक!
निवडणूक आयोगाचे काही अधिकार मिळणार राज्य सरकारला
आज पंतप्रधान मोदींनी केली युक्रेनच्या अध्यक्षांशी चर्चा
अनिल देशमुख यांच्यासह आर्थर रोड तुरुंगात नवाब मलिकही
दरम्यान, पेट्रोल आणि डिझेल भाव वाढले, तर आपसुकच महागाई वाढणार आहे. कारण वाहतूक खर्च वाढल्याचा परिणामाची झळ प्रत्येक क्षेत्राला बसत आहे. सध्या जागतिक अस्थिरतेमुळे शेअर बाजारात घसरण वाढली आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुन्हा एकदा गुंतवणूकदार सोन्याकडे वळले आहेत.